मानसोपचार तज्ञांच्या मते, या प्रवृत्तीमागे एकच नव्हे तर अनेक सामाजिक, मानसिक आणि आर्थिक घटक कारणीभूत आहेत. डॉ. रोहन जहागीरदार यांनी सांगितले की, अल्पवयीन गुन्हेगारी वाढीमागे इम्पलसिव्हिटी (उतावळेपणा), इमोशनल इनबॅलन्स (भावनिक अस्थिरता), व्यसन, कौटुंबिक वातावरण आणि आर्थिक ताणतणाव हे प्रमुख घटक आहेत. लहान वयातील मुलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता विकसित झालेली नसते, त्यामुळे ते सहज चुकीच्या मार्गाला लागतात.
advertisement
सोशल मीडियाचा वाढता प्रभाव
गुन्हेगारीकडे वळण्यामध्ये सोशल मीडियाचाही मोठा वाटा असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. आजच्या तरुण पिढीसाठी ‘लाईक्स’, ‘शेअर’ आणि ‘कमेंट्स’ हेच आत्ममूल्य वाटते आहे. स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण गुन्हेगारी कृतींकडे वळतात. काही प्रकरणांमध्ये रील स्टार्स किंवा गँगस्टर इमेज असलेल्या व्यक्तींना आदर्श मानण्याचं प्रमाणही वाढलं आहे.
कौटुंबिक वातावरणाचाही परिणाम
अनेक वेळा घरातील वातावरणच मुलांच्या वर्तनावर परिणाम करतं. पालकांमधील भांडणं, दुर्लक्ष, आर्थिक संकटं किंवा व्यसनाधीन पालक यामुळे मुलं भावनिकदृष्ट्या कमकुवत होतात. त्यांना योग्य मार्गदर्शन किंवा समुपदेशन मिळालं नाही तर ते चुकीच्या संगतीत सापडतात. पालकांनी मुलांच्या संगतीवर लक्ष ठेवणे, त्यांच्या भावनिक गरजा समजून घेणे आणि खुला संवाद ठेवणे गरजेचे असल्याचे मानसोपचार तज्ञांचे मत आहे.
बाल न्याय कायदा आणि त्यातील पळवाट
बाल न्याय (काळजी व संरक्षण) कायद्यानुसार, १८ वर्षाखालील मुलांनी केलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांना प्रौढ गुन्हेगाराप्रमाणे शिक्षा दिली जात नाही. अशा मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज असलेले म्हणून वर्गीकृत केले जाते. त्यांना निरीक्षणगृहात पाठवले जाते किंवा समुपदेशनाची सोय केली जाते. मात्र, याच कायद्याचा गैरफायदा घेत गुन्हेगार टोळ्या अल्पवयीन मुलांचा वापर करू लागल्या आहेत. कारण अल्पवयीन मुलांवर प्रौढांप्रमाणे कठोर शिक्षा होत नाही, त्यामुळे त्यांना वापरणं टोळ्यांसाठी सोपं ठरतं.
व्यसन आणि मानसिक विकार वाढते धोके
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, व्यसनाधीनता ही सध्या वाढत्या गुन्हेगारीचे एक प्रमुख कारण आहे. दारू, सिगारेट, नशेची औषधं किंवा ऑनलाईन गेम्स या व्यसनांमुळे निर्णयक्षमता कमी होते. याचबरोबर काही मुलांमध्ये पर्सनॅलिटी डिसऑर्डर दिसून येतात, ज्यामुळे राग, चिडचिड, आणि हिंसक वर्तन वाढतं.
तज्ञांचा सल्ला आहे की पालकांनी मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. त्यांच्या मित्रमंडळी, सोशल मीडियावरील क्रियाकलाप आणि शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवावं. शाळा-कॉलेजांनी मानसिक आरोग्य आणि भावनिक शिक्षणावर भर द्यावा. समाजानेही अशा मुलांना गुन्हेगार म्हणून नव्हे, तर सुधारण्याची संधी देणारे नागरिक म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे. अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी वाढीचं हे चित्र चिंताजनक असलं तरी योग्य मार्गदर्शन, कौटुंबिक पाठबळ आणि सामाजिक जबाबदारीद्वारे ही परिस्थिती निश्चित बदलता येऊ शकते.