श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने मंडईतील साखरे महाराज मठ येथे तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
एरवी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक असलेल्या वऱ्हाडी मंडळींनी आज चक्क श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळ्यानंतर परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होत, उत्तम आरोग्य आणि सुखी समाज याकरीता प्रार्थना केली. तब्बल 40 वर्षांहून अधिक काळ ही परंपरा सुरू आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक महेश सूर्यवंशी यांनी दिली.
advertisement
विवाह सोहळ्यापूर्वी आयोजित मिरवणुकीचे चौका-चौकात उत्साहात स्वागत करत श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीत फुगड्या घालत फेर धरुन महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दरबार ब्रास बँडदेखील सहभागी झाले होते. रांगोळीच्या पायघड्यांनी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला होता. दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघालेल्या मिरवणुकीचा समारोप समाधान चौक-रामेश्वर चौक-टिळक पुतळा मंडईमार्गे साखरे महाराज मठात झाला. त्यानंतर आयोजित विवाह सोहळ्याला पुणेकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.





