उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडीतील वाहतूक कोंडी व नागरी समस्यांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी स्थानिक प्रशासनाची स्पष्ट शब्दांमध्ये कानउघडणी केली. विविध समस्यांमुळे काही आयटी कंपन्या पुण्यातून इतर ठिकाणी स्थलांतरित होत असल्याचं वक्तव्य पवार यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक प्रशासनाचे धाबे दणाणले असून हिंजवडीतील वाहतूक कोंडी दूर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
advertisement
या पार्श्वभूमीवर आयटी विभागात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि शिक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, याचा आढावा लोकल 18ने घेतला आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) आणि नूतन ग्रुपच्या पीसीसीओई, पीसीसीओईआर आणि नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.
कंपन्या जाणार नाहीत, उलट येतील
पीसीईटी आणि नूतन महाविद्यालयातील सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्टाता प्रा. डॉ. शीतलकुमार रवंदळे म्हणाले, "पुण्यात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. वाहतुकीची समस्या निर्माण झाली असली तरी, ती लवकरच सोडवली जाईल. पुण्यातील वातावरण आणि संसाधने पाहता, कंपन्या पुण्याबाहेर जाण्याची शक्यता फारच कमी आहे. उलट भविष्यात इतर शहरांतील कंपन्याही पुण्याकडे वळण्याची शक्यता आहे."
सुरुवातीला चिंता होती, पण..
पुण्यातील आयटी कंपन्या स्थलांतरित होणार, अशा बातम्यांमुळे विद्यार्थ्यांनाही सुरुवातीला काळजी वाटू लागली होती. मात्र, या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास केला असता त्यांना आढळलं की, पुण्याची होणारी सर्वांगीण प्रगती, शैक्षणिक सुविधा आणि कामकाजासाठी योग्य वातावरण हे घटक आयटी क्षेत्रासाठी अनुकुल आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पुण्यातून आयटी कंपन्या बाहेर जाणं शक्य नसल्याचं मत, विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं.
प्रशासनाने वाहतूक कोंडी आणि इतर नागरी समस्या सोडवण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांसाठी पुणे एक मजबूत आणि विश्वासार्ह पर्याय ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.