तीन वर्षांपूर्वी या महिला गोविंदा पथकाची स्थापना झाली. सुरुवातीला यामध्ये 15 ते 20 महिलांचा समावेश होता. पहिल्याच वर्षी त्यांनी चार थर लावून यशस्वीरित्या दहीहंडी फोडली. त्यातून प्रेरणा घेत या वर्षी त्यांनी पाच थर लावण्याचे ठरवलं आहे. सध्या पथकात 15 ते 35 वयोगटातील सुमारे 70 महिला व मुली सक्रिय आहेत.
Success Story: पुण्यातील ‘स्केटर सिस्टर्स’, आजवर 54 पदकं केली नावावर, प्रेरणादायी प्रवासाचा Video
advertisement
पथकाच्या अध्यक्ष अनामिका परदेशी यांनी सांगितलं की, या उपक्रमाची सुरुवात साध्या विचारातून झाली होती. पुण्यात महिलांसाठी स्वतंत्र गोविंदा पथक नव्हते. महिलांवर असलेल्या जबाबदाऱ्या आणि वेळेअभावी सरावासाठी येणाऱ्या अडचणी, अशा अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पण, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आम्ही हे पथक उभं केलं आणि पहिल्याच 15 दिवसांत चार थरांची दहीहंडी लावली.
या महिला गोविंदा पथकामध्ये प्रामुख्याने वडगाव, तळजाई, आणि कसबा पेठ या भागांतील महिला आणि मुलींचा सहभाग आहे. सुरुवातीच्या वर्षी मोजक्याच महिला सहभागी झाल्या होत्या. पण, यावर्षी पथकातील सक्रिय सदस्यांची संख्या 70 पर्यंत पोहोचली आहे. या वाढत्या सहभागामुळे महिला गोविंदा पथकाला आता वेगवेगळ्या गणपती मंडळांकडून आणि सांस्कृतिक संघटनांकडून दहीहंडी सादरीकरणासाठी निमंत्रण मिळू लागले आहे.
या संपूर्ण उपक्रमामध्ये पुरुषांचा पाठिंबा देखील मोलाचा ठरतो. यामध्ये अमित देवरकर यांचे योगदान आहे. त्यांनी पथकाच्या स्थापनेपासून प्रशिक्षण, नियोजन, आणि सुरक्षेची जबाबदारी पार पाडली आहे. देवरकर म्हणाले, "महिलांसाठी गोविंदा पथक उभं करणं म्हणजे समाजात एक वेगळं आणि सकारात्मक उदाहरण मांडण्यासारखं आहे. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. पण, आता या पथकाची मागणी आणि प्रसिद्धी दोन्ही वाढत आहेत." या वर्षीच्या दहीहंडी उत्सवात पुण्यातील महिलांचे हे पहिले गोविंदा पथक पुणेकरांसाठी नक्कीच आकर्षण ठरणार आहे.