'या' तारखांना धावणार गाड्या
या वाढत्या प्रवाशांच्या गर्दीचा विचार करता रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आधीपासूनच धावणाऱ्या झेलम, हमसफर, दानापूर, गोरखपूर आणि आझाद हिंद एक्स्प्रेस यांसारख्या प्रमुख गाड्यांची आरक्षणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे गावी जाण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देणे ही मोठी गरज निर्माण झाली होती. रेल्वे विभागाने 22 ऑक्टोबरपासून ते 15 नोव्हेंबर या कालावधीत विविध मार्गांवर विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. यामुळे प्रवाशांना वेळेवर गावी पोहोचणे सोयीचे ठरणार आहे.
advertisement
कोणत्या मार्गांवर धावणार गाड्या?
या विशेष रेल्वे सेवेमध्ये पुणे–सावंतवाडी, सावंतवाडी–पुणे, पुणे–नागपूर, नागपूर–पुणे, पुणे–जोधपूर, जोधपूर–पुणे, पुणे–गोरखपूर, गोरखपूर–पुणे, पुणे–दरभंगा, दरभंगा–पुणे, पुणे–लखनौ आणि लखनौ–पुणे या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. या सर्व गाड्या अतिरिक्त वेळापत्रकानुसार धावणार असून गर्दी अधिक वाढल्यास रेल्वे प्रशासनाकडून जादा गाड्याही सोडल्या जातील.
विशेष म्हणजे, पुण्यातून निघणाऱ्या या गाड्यांचा लाभ महाराष्ट्रासह उत्तर भारतातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. प्रत्येक वर्षी दिवाळी आणि छटपूजेच्या काळात रेल्वे आरक्षणाची प्रचंड लगबग होते. यंदा तर आधीच प्रवासाची मागणी वाढल्यामुळे साधारण गाड्यांची तिकीटे मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे विशेष गाड्या हा प्रवाशांसाठी दिलासा ठरणारा निर्णय आहे.
रेल्वे प्रशासनाने नागरिकांना लवकरात लवकर तिकीटे आरक्षित करण्याचे आवाहन केले आहे. तसेच प्रवासादरम्यान सुरक्षितता,स्वच्छता आणि सोयी यांची योग्य काळजी घेतली जाणार असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुण्यातून बाहेरगावी जाणाऱ्या मोठ्या संख्येतील प्रवाशांचा प्रवास निर्विघ्न होण्यासाठी या गाड्या महत्त्वाची भूमिका पार पाडतील अशी अपेक्षा आहे.