गणेशोत्सव काळात पुण्यातील मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढते. त्यावेळी होणारी कोंडी टाळण्यासाठी नागरिकांच्या सोयीसाठी महामेट्रोकडून 26 ऑगस्ट रोजी भिडे पूल तातडीने खुला करण्यात आला होता. मात्र, आता उर्वरित काम पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याने पुलावरील वाहतूक पुन्हा थांबविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या काळात नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात येणार असून, पुणेकरांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
महामेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांबवेकर यांनी सांगितले की, भिडे पूल बंद राहणार असला तरी शहरातील वाहतुकीची सोय अबाधित ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी या मार्गांचा योग्य वापर करावा. पादचारी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर डेक्कन परिसरातील हजारो नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ पादचारी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
डेक्कन जिमखाना परिसर हा पुण्यातील सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. येथे शनिवारवाडा, टिळक रस्ता, फर्ग्युसन रस्ता, अप्पा बळवंत चौक, मंडई, लक्ष्मी रोड अशा मध्यवर्ती बाजारपेठांमुळे दररोज मोठ्या प्रमाणावर पादचारी आणि वाहनांची वर्दळ असते. मेट्रो स्थानक पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर येथे प्रवाशांची संख्या अधिक वाढणार आहे. त्यामुळे पादचारी पूल ही सुविधा नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
भिडे पूल बंद राहिल्याने काही काळासाठी वाहनचालकांना अडचण होणार असली तरी दीर्घकालीन दृष्टीकोनातून हा प्रकल्प पुणेकरांच्या सोयीचा ठरणार आहे. दरम्यान, पुणे शहर वाहतूक विभागानेही नागरिकांना गर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याची विनंती केली आहे.
मेट्रो प्रकल्पामुळे पुण्याच्या वाहतुकीला दिलासा मिळणार असून, डेक्कन जिमखान्यासारख्या गर्दीच्या भागात पादचारी पूल हे मोठे पाऊल मानले जात आहे. आगामी महिनाभर या पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.