महापालिकेला खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून 11.50 टीएमसी, पवना धरणातून 0.34 टीएमसी आणि भामा-आसखेड जलाशयातून 2.67 टीएमसी पाणी मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे 2024-25 मध्ये पुणेकरांनी 22 टीएमसी पाणी वापरले होते. यामध्ये खडकवासला धरणातून 19.75 टीएमसी, पवना धरणातून 0.36 टीएमसी आणि भामा-आसखेडमधून 1.90 टीएमसी पाण्याचा समावेश होता.
खडकवासला धरणाची एकूण क्षमता 29.50 टीएमसी आहे. मागील वर्षी शेतीसाठी तीन आवर्तनांतून सुमारे 15 टीएमसी पाणी सोडण्यात आले. पावसाळ्यात मुठा नदीत तब्बल 32 टीएमसी पाणी वाहून दिले गेले. या काळात महापालिकेला देण्यात आलेले 7.5 टीएमसी पाणीही एकूण साठ्यात धरले गेले. त्यामुळे पालिका अपेक्षेपेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
advertisement
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत उपलब्ध साठ्यावरच पुणे पालिकेचा कोटा निश्चित करावा, अशी मागणी होत आहे. कारण पालिकेने जूनपर्यंत घेतलेल्या पाण्याची नोंद केली तर एकूण वापर केवळ 12 टीएमसी इतकाच राहतो. यामुळे अंदाजपत्रक मंजूर करताना पाटबंधारे विभागाने पुन्हा खडकवासला उपसा केंद्र ताब्यात घेण्याची मागणी पुढे केली आहे.