पुणे : अजित पवारांच्या हाताने काही चुका झाल्या असतील, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. आता जे झालं ते झालं. पण या निवडणुकीत सुनेत्रा वहिनींना आम्ही बहुमताने निवडून आणू, बारामती लोकसभेचा सातबारा अजित पवारांच्या नावावर होणार, असं म्हणत शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी अखेरीस तलवार म्यान केली आहे.
advertisement
बारामती मतदारसंघात निवडणूक लढवणारच अशी गर्जना करून विजय शिवतारे यांनी महायुतीत खळबळ उडवून दिली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बऱ्याच वेळा समजूत काढली पण तरीही शिवतारे माघार घेण्यास तयार नव्हते. अखेरीस पक्षांतर्गत कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन माघार घेतली.
'माझं आयुष्य किती आहे हे मला माहित नाही. मी अनेक आजारांनी त्रस्त आहे. हे लक्षात घेता, जनतेचं हित मी जोपासायचं ठरवलं आहे. निवडणूक न लढता आपल्या मागण्या मान्य होत आहेत. दीड लाखांचं लीड पुरंदर तालुक्यातील महायुतीला द्यायचं, आमचं ठरलं आहे' असं म्हणत विजय शिवतारेंनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं.
'साडे पाच लाख मतं पवार विरोधी आहेत, पण यातील एक पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहेत. एक पवार आमच्याकडे आहेत, त्यामुळं ही साडे पाच लाख अजित दादांना मिळतील. आम्ही त्यांना समजावून सांगू. आमचे वरिष्ठ नेते त्यांना सांगितलंच,असंही शिवतारे म्हणाले.
मी महिलांसमोर उत्स्फूर्तपणे बोललो. 5 लाख 80 हजार पवार विरोधी मतं कोणाला जाणार, यासाठी मी तिसरा पर्याय या मतदारांसमोर ठेवला आणि ही लोकसभा निवडणूक लढायचीच ही घोषणा केली होती. आता कार्यकर्त्यांशी चर्चा केली, त्यांच्या तिखट प्रतिक्रिया ही उमटल्या. पण मी लढल्यावर काय होईल, यावर ही कारणमीमांसा झाली. पण मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक झाली. मी इतके दिवस मुख्यमंत्र्यांचे ऐकत नव्हतो, ते रागावले ही माझ्यावर. मला एक फोन ही आला, मुख्यमंत्री अडचणीत आहेत, त्यांना आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल. 15 ते 20 लोकसभा उमेदवार पडू शकतात. असं मला सांगण्यात आलं. यामुळं महायुतीला मोठा फटका बसणार होता, असंही शिवतारेंनी सांगितलं.
