ही घटना 22 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. पारगावच्या मुख्य बाजारपेठेतील राहू-पारगाव रस्त्यावरील एक खासगी सोन्याचं दुकान चोरट्यांचं लक्ष्य होतं. यासाठी एकूण चार चोरटे मोटारीतून आले होते. त्यांनी दुकानाच्या दरवाजावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा काठीच्या साहाय्याने बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोरील आयसीआयसीआय बँकेचे सुरक्षा रक्षक हे दृश्य पाहत होते. त्यांनी तात्काळ सोन्याचे दुकान मालक मनोहर सिंग नागवेसी यांना फोन करून माहिती दिली.
advertisement
नागवेसी यांनी गावातील युवकांना फोनवरून याबद्दलची माहिती दिली. यानंतर तरुण लगेचच घटनास्थळी दाखल झाले. युवक येत असल्याचं पाहून चोरट्यांनी आपल्या वाहनातून पळ काढला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या शेतात लपून बसले. ओंकार ताकवणे, बापूराजे ताकवणे, ॲड. वैभव बोत्रे, राहुल टिळेकर, सुधीर बोत्रे, प्रसाद ताकवणे, राहुल ताकवणे, डॉ. अमोल जांबले, सुभाष शिंदे या तरुणांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. चोरटे सापडत नसल्याने युवकांनी एका अंधाऱ्या ठिकाणी दबा धरला.
Pune News: सायंकाळची वेळ; शेतात गेलेल्या तरुणावर बिबट्याची अचानक झडप, पण शेवट वेगळाच
ग्रामस्थ निघून गेल्याचं वाटताच चारपैकी दोन चोरटे पुन्हा उसाच्या शेतीतून रस्त्यावर आले. तेवढ्यात दबा धरून बसलेल्या युवकांनी त्यांना पाहताच सुमारे 200 मीटर धावून पाठलाग केला. अखेर, सुभाष शिंदे, वैभव बोत्रे आणि राहुल टिळेकर यांनी या दोन चोरट्यांना शिताफीने पकडलं. चोरट्यांना पकडल्यानंतर युवकांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला आणि त्यानंतर यवत पोलिसांना बोलावलं.
यवत पोलिसांनी घटनास्थळी येऊन राहुल मालवी आणि प्रेमचंद चित्रावट या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तरुणांच्या धाडसामुळे पारगावमधील मोठी चोरी टळली आहे.
