पुणे - पिंपरी चिंचवड शहरातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. शहरातील भोसरी सद्गुरू नगर परिसरात असलेल्या एका लेबर कॅम्पमध्ये कामगारांच्या वापरासाठी उभारलेल्या पाण्याची टाकी कोसळली. आज सकाळी 6 ते 6.30 च्या दरम्यान घडलेल्या या दुर्घटनेमध्ये 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर 7 कामगार गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
advertisement
नेमकं काय घडलं -
सकाळच्या सुमारास हे कामगार अंघोळ करत असतांना पाण्याच्या दबावाने ही टाकी फुटली असावी, असा प्रार्थमिक अंदाज असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी म्हटले आहे. तसेच घटनास्थळी रुग्णवाहिका उशिरा दाखल झाल्याने कामगारांचा मृत्यू झाला, असा आरोप देखील इतर कामगारांनी केला.
दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवडमधील अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. ज्या लेबर कॅम्प परिसरात ही घटना घडली त्या ठिकाणी 1 हजारहून अधिक कामगार वास्तव्यास आहेत. त्या पाण्याच्या टाकीखाली हे कामगार काम करत होते. त्या टाकीचे काम पूर्ण होऊन काही दिवस देखील झाले नव्हते. बांधकाम कच्च असल्याने ही टाकी पडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
परतीच्या पावसाचा कहर, बीडमध्ये कांदा पिकाचे मोठे नुकसान, ground report
दरम्यान, ही जागा रेड झोनमध्ये येत असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि पिंपरी चिंचवड पोलीस याबाबत चौकशी करत आहे. या घटनेमुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून जो कुणी यामध्ये दोषी आढळेल, त्यावर कारवाई केली जाईल, असे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.