हवामान विभागाने चार महिन्यांत देशभरात कसा पाऊस झाला आहे, त्याची माहिती जारी केली आहे. त्यानुसार जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली. परंतु जुलै आणि सप्टेंबर महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. देशभरात जून महिन्यात 151.1 मिमी म्हणजे सरासरीच्या केवळ 91 टक्के पाऊस झाला. जुलै महिन्यात 315.9 मिमी पाऊस झाला. यामुळे या महिन्याची सरासरी 113 टक्के झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने दडी मारली. चार महिन्यात सर्वात कमी पाऊस ऑगस्ट महिन्यात झाला. या महिन्यात 162.7 मिमी म्हणजे सरासरीच्या केवळ 64 टक्के पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा अनुशेष भरुन काढला. या महिन्यात 190 मिमी पाऊस झाला म्हणझे सरासरी 113 टक्के आहे.
advertisement
पुढच्या दोन ते तीन दिवसात राज्यात परतीचा पाऊस : होसाळीकर
राज्यात ऑगस्ट महिन्यात 122 वर्षांतील निच्चाकी पाऊस पडला होता. मात्र, सप्टेंबरमध्ये ती तूट भरून निघाली. राज्यावरचं मोठं संकट दूर झालं आहे. हवामान खात्याने दिलेला अंदाज खरा ठरला असून राज्यात जवळपास 95 टक्के पाऊस पडला. राज्यातील चारही विभागात सरासरी इतका पाऊस झाला आहे. काही जिल्ह्यात अद्याप पाऊस नाही. हवामान खात्याने दिलेला अंदाज तंतोतंत खर ठरला. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. राज्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसात राज्यात परतीचा पाऊस सुरू होणार आहे. परतीच्या पावसादरम्यान काही ठिकाणी मेघ गर्जनेसह जोरदार पाऊस होणार आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात पावसाचे प्रमाण कमी झालं आहे, अशी माहिती के एस होसाळीकर यांनी दिली.