पुणे जिल्ह्यात सप्टेंबर 2023 मध्ये मुद्रांक शुल्क संकलनात भरीव वाढ दिसून आली आहे. ही वाढ वार्षिक 63 टक्क्यांनी वाढून एकूण 580 कोटी रुपयांवर पोहोचली. शिवाय, सप्टेंबर 2023 मध्ये नोंदणीकृत मालमत्तांचं एकत्रित मूल्य 12,286 कोटी रुपये होतं. आर्थिक वर्ष 2023 सुरू झाल्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत पुण्यात एकूण 1,07,445 मालमत्तांची नोंदणी झाली आहे. या काळात मागील आर्थिक वर्षात म्हणजेच वर्ष 2022 मध्ये 100,166 मालमत्तांची नोंदणी झाली होती. त्या तुलनेत यंदा मालमत्तांच्या नोंदणीत 7 टक्के वाढ झाली आहे. तसंच या काळात मुद्रांक शुल्क संकलनामध्येही मागच्या वर्षाच्या तुलनेत 12.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष सुरू झाल्यापासून सप्टेंबरपर्यंत एकूण जमा झालेलं मुद्रांक शुल्क 3,805 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.
advertisement
दुसरीकडे, पुण्यातल्या नोंदणीकृत मालमत्तांच्या एकूण मूल्यातदेखील लक्षणीय वाढ झालीय. ते वार्षिक 33 टक्क्यांनी वाढून 81,300 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.
घरांना सर्वांत जास्त मागणी
सप्टेंबर 2023 मध्ये खरेदी करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये घर खरेदीला खूपच मागणी असल्याचं आकडेवारीवरून दिसून येतंय. या काळात 25 लाख ते 50 लाख रुपयांच्या दरम्यान असलेल्या निवासी घरांना सर्वाधिक मागणी होती. त्याचं प्रमाण सर्व गृहनिर्माण व्यवहारांमध्ये 34.4 टक्के होतं. 50 लाख ते 1 कोटी रुपयांच्या दरम्यानच्या घरांचा वाटा त्यात 33.6 टक्के होता.
विशेष म्हणजे 1 कोटी रुपये आणि त्याहून अधिक किमतीच्या घरांचा वाटा सुद्धा वाढला आहे. अशा घरांच्या खरेदीचा मुद्रांक शुल्कात वाटा सप्टेंबर 2022 मध्ये 9 टक्के होता. तो सप्टेंबर 2023 मध्ये 11 टक्क्यांपर्यंत वाढलाय. 2.5 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या घरांची खरेदी सप्टेंबर 2023 मध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत 97 टक्क्यांनी वाढली आहे. सप्टेंबर 2022मध्ये 2.5 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या 58 घरांची नोंदणी झाली होती. यंदा सप्टेंबरमध्ये मात्र 2.5 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या 114 घरांची नोंदणी झाली आहे. ही आकडेवारी रिअल इस्टेट मार्केटमध्ये होत असलेली वाढ, तसंच नागरिकांची वाढलेली आर्थिक ताकद याचे संकेत देतेय.
मोठ्या अपार्टमेंटच्या मागणीत होतेय वाढ
सप्टेंबर 2023 मध्ये 500 ते 800 चौरस फुटांच्या मर्यादेतल्या अपार्टमेंट्सना जोरदार मागणी होती. ही मागणी या महिन्यात नोंदवलेल्या सर्व मालमत्ता व्यवहारांपैकी एकूण 51 टक्के होती. 500 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या अपार्टमेंट्सच्या नोंदणीतही लक्षणीय वाढ झाली आहे. सप्टेंबर 2023 मध्ये झालेल्या एकूण व्यवहारात अशा व्यवहारांचा समावेश 25 टक्के होता. त्याचा अर्थ दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक पसंती 500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या अपार्टमेंट्सना आहे. उल्लेखनीय म्हणजे, मोठ्या अपार्टमेंट्समध्ये घरखरेदी करण्यातसुद्धा लक्षणीय वाढ होत आहे. ज्या मालमत्तांचं क्षेत्रफळ 800 चौरस फुटांपेक्षा जास्त आहे, त्यांचा मार्केटमधला सप्टेंबर 2022 मध्ये 22 टक्क्यांवर असणारा हिस्सा सप्टेंबर 2023 मध्ये 24 टक्क्यांपर्यंत गेला आहे.
पुण्यातलं रिअल इस्टेट मार्केट भरभराटीला येतंय
पुण्यात मालमत्तांच्या वाढलेल्या नोंदणीबाबत नाइट फ्रँक इंडियाचे चेअरमन शिशिर बैजल म्हणाले, 'घररेदीची वाढणारी मागणी आणि शहरातली अनुकूल, परवडणारी परिस्थिती यामुळे पुण्यातलं रिअल इस्टेट मार्केट भरभराटीला येत आहे. याशिवाय, मोठ्या क्षेत्रफळाचं घर खरेदी करणार्यांची वाढती पसंती पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रासाठी खूपच चांगली आहे. पायाभूत सुविधांमध्ये सतत होत असलेल्या सुधारणा, आर्थिक विस्तार यामुळे पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटची लवचिकता वाढली आहे.’
वाचा - 10 हजारांच्या कर्जावर सुरू केला दागिन्यांचा व्यवसाय; आज आहे 1400 कोटींचा मालक
पुणे व पिंपरी चिंचवडचा मोठा वाटा
सप्टेंबर 2023मध्ये नोंदणी झालेल्या एकूण मालमत्तांमध्ये हवेली तालुका, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांचा समावेश असलेल्या मध्य पुण्यातल्या निवासी मालमत्तांच्या खरेदीचं वर्चस्व आहे. सप्टेंबर 2023मध्ये नोंदणी झालेल्या एकूण मालमत्तांमध्ये या तीन भागातल्या मालमत्तांचा तब्बल 75 टक्के हिस्सा आहे. मागच्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ही टक्केवारी मोठी आहे. मावळ, मुळशी आणि वेल्हे यांसारख्या भागांत निवासी मालमत्ता खरेदी करण्याचं प्रमाणही चांगलं आहे. सप्टेंबर 2023मध्ये नोंदणी झालेल्या मालमत्तांमध्ये या भागातल्या मालमत्तांचं प्रमाण एकूण 15 टक्के आहे. याउलट, जिल्ह्याच्या उत्तर, दक्षिण आणि पूर्व भागात मालमत्ता नोंदणीचं प्रमाण अवघं 10 टक्के होतं.
30-45 वयोगटातले गृहखरेदीदार जास्त
नवीन घर खरेदी करणाऱ्यांमध्ये 30-45 वर्षं वयोगटातल्या नागरिकांचा समावेश जास्त आहे. त्यांचा एकूण रिअल इस्टेट मार्केटमधल्या खरेदीचा वाटा 53 टक्के आहे. 30 वर्षांखालच्या नागरिकांचा मार्केटमधला हिस्सा 21 टक्के आणि 45-60 वर्षं वयोगटातल्या नागरिकांचा मार्केटमधला खरेदीचा हिस्सा 19 टक्के आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात वाढलेल्या मालमत्तांच्या खरेदीमागे बँकांकडून सहजासहजी उपलब्ध होणारं होमलोन हेदेखील कारण आहे. तसंच रिअल इस्टेट मार्केटमध्ये व्यावसायिकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.