श्री क्षेत्र मुर्डेश्वर येथून पायी दिंडीची परंपरा बालयोगी काशी महाराज यांनी सुरू केलेली आहे. ही पायी दिंडी मुर्डेश्वर ते पैठण आणि हातगावमार्गे पंढरपूर येथे पोहोचणार आहे. या दिंडी सोहळ्यात सध्या 70 वारकरी असून दिंडी चालत असताना आणखी काही भाविकांचा समावेश या दिंडीत होणार आहे. त्यामुळे या दिंडीतील वारकऱ्यांची संख्या 500 हून अधिक होईल, असे दिंडी प्रमुख विनोद चोपदार यांनी सांगितले.
advertisement
या दिंडीचा पहिला मुक्काम रेलगाव येथे झाला असून दुसरा आणि तिसरा मुक्काम मोढा व फुलंब्री या गावात झाला. या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवासात लागणाऱ्या प्रत्येक गावात दिंडीतील वारकऱ्यांची जेवणाची आणि राहण्याची सोय तेथील ग्रामस्थांकडून केली जाते. दिंडीच्या मुक्कामाची ठिकाणे आणि इतर बाबी पूर्वापार ठरलेल्या आहेत. पहाटे काकडा भजनाने दिवसाची सुरुवात होते. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भजन कीर्तनाच्या निनादात ही दिंडी आषाढी वारीसाठी पंढरीत दाखल होते.
दिंडीतील वारकऱ्यांच्या आणि त्यांच्या प्रवासाबद्दल चोपदार यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ही दिंडी 4 जुलैपर्यंत पंढरपूर येथे पोहोचेल. सध्याच्या घडीला 70 वारकरी असून वाटेत आणखी वारकऱ्यांचा समावेश होणार आहे. ही संख्या 500 च्या वर जाते, असं ते सांगतात. या दिंडी सोहळ्यात सहभागी होणारे वारकरी मोठ्या उत्साहात, पारंपारिक पद्धतीने भजन-कीर्तन करीत पंढरपूरच्या दिशेने जात आहेत.





