पालखी सोहळ्यातील कोठी घर
पालखी सोहळ्यात दरवर्षी कोठी घर अर्थात ‘भांडार’ हे एक महत्त्वाचे केंद्र असते. या कोठी घरातून माऊलींच्या पूजेसाठी आणि दैनंदिन नैवेद्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची व्यवस्था केली जाते. यात सुई-दोऱ्यापासून ते रथासाठी लागणाऱ्या अवजारे, तंबू, भांडी, गॅस शेगडी, मिक्सर, पाण्याच्या घागऱ्या, टाळ, वीणा, पखवाज, पूजा साहित्य, किराणा माल, चांदीची भांडी, इत्यादींचा समावेश असतो.
advertisement
वारकऱ्यांची जेवणाची सोय
दररोज 250 ते 300 वारकऱ्यांसाठी अन्नाची सोय केली जाते. यासाठी लागणारा किराणा माल आधीच खरेदी करून ठेवला जातो. दोन वेळेचं जेवण तयार करण्यासाठी लागणारी प्रत्येक वस्तू तेल, डाळ, तांदूळ, मसाले, भाज्या यांचे नियोजन कोठी घरातून होत असते.फक्त स्वयंपाकच नव्हे तर, कार्यालयीन कामासाठी लागणारी स्टेशनरी, पिना, सुई-दोरा, कागदपत्रे यांचीसुद्धा तजवीज केली जाते. हे सर्व साहित्य माऊलींच्या रथासोबत नियमितपणे स्थलांतरित होते.
श्रद्धा सेवाभाव आणि शिस्त
या संपूर्ण व्यवस्थेचा गाभा म्हणजे भक्ती आणि शिस्त होय. माऊलींच्या सोहळ्यातील हा एकात्मता, नियोजन आणि निष्ठेचा अनुभव म्हणजेच ‘वारी संस्कृती’चा खरा अर्थ. प्रत्येक वस्तूचा हेतू हा माऊलींच्या पूजेसाठी, वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि या अद्वितीय सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी असतो. कोठी घर व्यवस्थापकांच्या म्हणण्यानुसार, ही परंपरा फक्त वस्तूंची नव्हे, तर श्रद्धा, सेवाभाव आणि शिस्तीची आहे, जी प्रत्येक वर्षी अधिकाधिक दृढ होत आहे.