सुव्रत बेडेकर गुरुजी यांच्यानुसार पाडव्याला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व फार मोठे आहे. पौराणिक कथा सांगते की या दिवशी राजा बळी पाताळातून पृथ्वीवर येतो आणि आपल्या प्रजेची भेट घेतो. विष्णूंनी बळीला पाताळात पाठवताना वचन दिले होते की वर्षातून एकदा त्याला पृथ्वीवर येण्याची परवानगी असेल. म्हणूनच या दिवसाला बलिप्रतिपदा म्हणून ओळख दिली गेली आहे. ही परंपरा आजही जपली जात आहे.
advertisement
महाराष्ट्रामध्ये पाडव्याला नववर्षारंभ मानले जाते. या दिवशी व्यावसायिक लोक नवीन हिशोबाच्या वह्या (खातेबही) सुरू करतात. काही भागांमध्ये या दिवसाला वर्ष प्रतिपदा म्हणूनही साजरे केले जाते.
बेडेकर गुरुजी सांगतात की, पाडव्याच्या दिवशी सकाळी उठून स्वच्छ स्नान करावे. घरात रंगीबेरंगी रांगोळी काढावी, मुख्य दरवाज्यावर तोरण लावून शुभचिन्हांची मांडणी करावी. पती-पत्नी एकमेकांना नवीन वस्त्र, फुले, उपरणे आणि गोड पदार्थ देऊन शुभेच्छा द्याव्यात. महिलांकडून पतीला औक्षण करून गंध, अक्षता लावून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या जातात.
संध्याकाळी लक्ष्मीपूजनानंतर घरात बलिप्रतिपदेची पारंपरिक पूजा केली जाते. काही ठिकाणी राजा बळीच्या प्रतिकात्मक मूर्तीची प्रतिष्ठापना करून विशेष पूजा केली जाते.
दिवाळी पाडवा हा केवळ धार्मिक सण नाही, तर हा कुटुंबातील प्रेम, नातेसंबंध आणि सामाजिक सौहार्दाचा उत्सव आहे. या दिवशी पती-पत्नी एकमेकांच्या सहवासातील प्रेम नव्याने अनुभवतात आणि वर्षभरासाठी शुभ संकल्प करतात.