वर्षभरातील पहिली 'मौनी अमावस्या' कधी आहे?
पंचांगानुसार, 2026 मधील पहिली अमावस्या 18 जानेवारी 2026, रविवार रोजी आहे. 17 जानेवारीच्या मध्यरात्री 12:04 मिनिटांनी अमावास्येला सुरुवात होईल. 18 जानेवारीच्या रात्री 1:22 वाजेपर्यंत हा कालावधी असेल. उदयातिथीनुसार 18 जानेवारीलाच मौनी अमावस्या मानली जाईल.
मौनी अमावस्येला हळदी कुंकू करावे की नाही?
शास्त्रानुसार, अमावस्या ही तिथी पितृ कार्यासाठी आणि स्नानासाठी अत्यंत शुभ असली, तरी ती 'अमंगल' किंवा 'अशुभ' मानली जात नाही. मात्र, हळदी कुंकू हा 'सौभाग्य उत्सव' आहे आणि तो सगुण भक्तीचा भाग आहे. धार्मिक मान्यतांनुसार, अमावस्येच्या दिवशी कोणतेही मांगलिक किंवा उत्सव स्वरूपाचे सोहळे करणे टाळावे. अमावस्येला नकारात्मक लहरींचे प्राबल्य जास्त असते, तर हळदी कुंकू हे आदिशक्तीच्या जागराचे प्रतीक आहे. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी हळदी कुंकू करू नये, असा सल्ला दिला जातो. जर तुमचे हळदी कुंकू मकर संक्रांतीला किंवा त्यानंतरच्या दिवसांत राहिले असेल, तर तुम्ही ते 19 जानेवारीपासून रथसप्तमी पर्यंत कधीही करू शकता.
advertisement
चुकून अमावस्येला हळदी कुंकू केले तर काय होईल?
अनेकदा माहिती नसल्यामुळे काही महिला अमावस्येला हळदी कुंकू आयोजित करतात. शास्त्रात असे कुठेही लिहिलेले नाही की यामुळे काही भयंकर संकट येईल. मात्र, अमावस्येच्या दिवशी पितरांचे स्मरण केले जाते. अशा दिवशी उत्सव केल्याने पूजेचे पूर्ण फल मिळत नाही आणि मनात एक प्रकारची भीती राहते. जर चुकून हळदी कुंकू झाले असेल, तर घाबरून न जाता दुसऱ्या दिवशी देवीसमोर दिवा लावून क्षमायाचना करावी. 'भाव' महत्त्वाचा असतो, त्यामुळे देवाचा कोप होईल अशी भीती बाळगू नका.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
