अमरावती : नवरात्रोत्सवात अष्टमी ही सर्वात महत्त्वाची तिथी मानली जाते. या दिवशी महापूजा करतात. ज्या घरी घटस्थापना असते तिथं कन्यापूजन केलं जातं. तसंच या दिवसाचा उपवास अत्यंत महत्त्वाचा मानतात.
असं म्हणतात की, नवरात्रीत साक्षात दुर्गा देवी पृथ्वीवर राहायला येते, त्यामुळे या 9 दिवसांमध्ये तिच्या 9 रूपांची भाविक मनोभावे पूजा करतात. हे सर्व 9 दिवस अत्यंत शुभ आणि प्रसन्न वातावरणाचे असतात. परंतु त्यातही अष्टमी तिथीला विशेष महत्त्व आहे.
advertisement
ज्योतिषी प्रफुल येलकर यांनी सांगितलं की, अष्टमी ही नवरात्रीतील अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. या दिवशी अनेक विशेष पूजा केल्या जातात, हवन केलं जातं. घरगुती घटाचं उद्यापन करतात. तसंच जर नवरात्रीचे 9 दिवस उपवास केले नसतील, तर आपण अष्टमीचा उपवास करू शकता.
अष्टमी पूजेची मुहूर्त वेळ काय?
10 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजून 21 मिनिटांनी सुरू झालेली अष्टमी तिथी 11 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजून 6 मिनिटांनी समाप्त होणार आहे. पंचांगनुसार सूर्योदय होण्याआधी असलेल्या तिथीला अपूर्ण तिथी मानली जाते. त्यामुळे यंदा 11 ऑक्टोबरला अष्टमी साजरी केली जातेय. म्हणजेच यंदा अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आहे.
पूजाविधी:
ज्योतिषी सांगतात, नवरात्रीच्या अष्टमी तिथीला नेहमीप्रमाणे पूजा करू नये. आपण पंचोपचार पूजन करू शकता. मातीचे 9 कलश स्थापन करून त्यात देवीच्या 9 रूपांचं आवाहन करूनही पूजा करू शकता. त्यानंतर कुलदेवीचं पूजन करू शकता. कन्यापूजन करून अन्नदान करू शकता. माता महागौरी हे अन्नपूर्णेचं रूप असल्यानं तिचीही पूजा करू शकता.
सूचना: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.