धाराशिव : जिल्ह्यातील श्री दत्त मंदिराची संपूर्ण राज्यभरात ख्याती आहे. इथं दर्शनासाठी दररोज भाविकांची मांदियाळी असते. 2 वर्षांपूर्वी या मंदिरात 5 किलो तांदळांपासून प्रसाद बनवला जायचा. परंतु आता दर गुरूवारी 1000 भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते.
धाराशिवमध्ये साल 1974 पासून दरवर्षी भरवण्यात येणारी श्री दत्त यात्रा प्रसिद्ध आहे. श्री दत्त मंदिरात दर गुरूवारी 900 ते 1000 भाविक जेवतील अशी महाप्रसादाची व्यवस्था असते. वरण, भात, शिरा, इत्यादी स्वादिष्ट पदार्थ प्रसादात असतात. मंदिराचे धार्मिक विधी नित्यनियमाने पार पडतात. गुरुवारी सायंकाळी 7 वाजता आरती झाल्यानंतर सर्व भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.
advertisement
सुरूवातीला 12 जणांनी मिळून दत्त प्रसादिक मंडळाच्या माध्यमातून स्वखर्चाने, निधी गोळा करून महाप्रसादाची सुरूवात केली. आता अनेक भक्तगण आपापल्या परीने प्रसादाची सोय करतात. भाविकांकडून पुढील 2 महिन्यांच्या प्रसादाच्या नियोजनाचं बुकिंग आधीच करण्यात आलंय, अशी माहिती प्रसादिक मंडळाचे विश्वस्त प्रविण कोराळे यांनी दिली.
अवघ्या 5 किलो तांदळांपासून सुरू झालेल्या प्रसादाचं नियोजन आता दर गुरूवारी 900 ते 1000 भाविकांच्या प्रसादापर्यंत आलं आहे. श्री दत्त मंदिराच्या दत्त प्रसादिक मंडळानं केलेलं हे नियोजन प्रेरणादायी आहे.