हिंदू धर्मात गणपतीला आद्य देवता मानलं जातं. कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला सर्वांत अगोदर गणपतीची पूजा केली जाते. श्री गणेशाची नियमित पूजा केल्याने भक्तांच्या आयुष्यातली सर्व दु:खं आणि संकटं दूर होतात, असं म्हटलं जातं. श्रीगणेशाला बुद्धीचा दाता म्हणूनही ओळखलं जातं. अशा या विघ्नहर्त्याला प्रसन्न करण्यासाठी त्याची गणेशोत्सवात आराधना केली जाते.
गणेश चतुर्थीच्या दिवसापासून पुढचे दहा दिवस गणपतीची सेवा केली जाते. गणपतीला आवडणारे पदार्थ अर्पण केले जातात. दहा दिवसांनी गणपती पाण्यात विसर्जित केला जातो. असं मानलं जातं, की दहा दिवस घरात राहून श्रीगणेश भक्तांची सर्व दुःखं दूर करतो आणि त्यांना सुखी जीवनाचा आशीर्वाद देतो.
advertisement
पौराणिक कथेनुसार, व्यास मुनींनी महाभारत हा ग्रंथ लिहिण्यासाठी गणेशाची निवड केली होती. व्यासमुनी तोंडाने कथा सांगणार आणि गणपती तिचं लेखन करणार, असं ठरलं होतं. कथा सांगताना व्यासमुनींनी डोळे बंद केले होते. त्यामुळे त्यांना दिवस-रात्रीची काहीही कल्पना आली नाही. त्यांनी सलग दहा दिवस गणपतीला कथा सांगितली आणि गणपतीनेही कोणतीही तक्रार न करता तिचं लेखन केलं. त्यामुळे श्रीगणेशाच्या शरीराचं तापमान खूप वाढलं होतं. याची कल्पना आल्यानंतर व्यासमुनींनी गणपतीला तलावात आंघोळ घातली होती. तेव्हापासून गणेश विसर्जन पाण्यात करण्याची प्रथा सुरू झाली.
astro tips: श्री गणेशाचे हे खास उपाय करा, आयुष्यातील प्रत्येक संकट दूर होईल
भारतासह जगभरातले गणेशभक्त हा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करतात. दहा दिवसांच्या काळात सर्वत्र गणपती बाप्पाचा जयघोष ऐकायला येतो. मुंबई आणि पुणे शहरामध्ये तर या उत्सवाचं विलक्षण रूप बघायला मिळतं. अनंत चतुर्दशीच्या दिवशी 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात या मूर्तीचं विसर्जन केलं जातं. काही जण दीड दिवस, पाच दिवस किंवा सात दिवसांनंतरदेखील गणेश विसर्जन करतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)