यंदा या 30 मार्च 2025 रोजी रविवारी नविन हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे. अर्थात चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडवा साजरा करत या दिवशी सकाळी सर्व घरांवर गुढ्या उभारल्या जातात. ही गुढी उभारताना हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, गुढीचे मोठे वस्त्र, कडुनिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ, साखरेचे माळ यासह विधिवत पूजा केली जाते. गुढीला नैवेद्य दाखवला जातो आणि सायंकाळी ही गुढी उतरवली जाते हे सर्व करताना मनात भक्तिमय भावना असणे गरजेचे आहे, असे पुरोहित संदीप दादर्णे यांनी सांगितले आहे.
advertisement
कशी आणि कधी उतरवली जावी गुढी
सकाळी उभारण्यात आलेली गुढी सायंकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी उतरवणे गरजेचे असते. या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्यास्ताची वेळ ही सायंकाळी 06 वाजून 37 मिनिटे आहे. सकाळी आपण ज्या प्रकारे गुढीची पूजा करतो. त्यासाठी विधिवत पूजा करूनच गुढी उभारायची असते. यावेळी एक प्रकारची उत्तर पुजाच केली जावी. हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, उदबत्ती अशी पंचोपचार पूजा करून गुढी उतरवावी. गुढी उतरताना साखरेचा नैवेद्यही दाखवू शकता, असे दादर्णे यांनी सांगितले.
गुढी उतरल्यानंतर गुढीच्या साहित्याचे काय करावे?
गुढी खाली उतरल्यानंतर त्याचे सर्व साहित्य योग्य पद्धतीने हाताळले जाणे गरजेचे आहे. गुढीसाठी वापरलेला कलश पुन्हा पूजेसाठी वापरला जावा. गुढीसाठी वापरलेले वस्त्र छोटे असेल, तर ते मंदिरात दान करू शकता. जर मोठे वस्त्र किंवा साडी असेल तर स्वतः देखील वापरू शकता. कडुलिंब धान्यामध्ये मिसळू शकता. गुढीची साखरेची माळ प्रसाद म्हणून खाल्ली जावी. तर गुढीजवळ ठेवलेला नैवेद्य गायीला अर्पण करावा. रांगोळी वाहत्या पाण्यात सोडावी आणि निर्माल्य योग्य ठिकाणी विसर्जित करावे, अशी माहिती संदीप दादर्णे यांनी दिली आहे.
दरम्यान सध्या फ्लॅट संस्कृतीमुळे छोट्या सजवलेल्या गुढी बाजारात विकत मिळतात. त्या देखील अशाच पद्धतीने संध्याकाळी विधिवत पूजा करूनच आतमध्ये घ्यावी आणि योग्य ठिकाणी ठेवावी, असेही दादर्णे यांनी स्पष्ट केले आहे.