मुंबई: सध्या नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र आनंदाचं, उत्साहाचं, प्रसन्न वातावरण आहे. असं म्हणतात की, या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवी पृथ्वीवर राहायला येते, त्यामुळे तिच्या 9 रुपांची भाविक मनोभावे पूजा करतात. नारीशक्तीचं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या या सणात कुमारिका पूजनही केलं जातं. ज्याला कन्या पूजन म्हणतात. नवरात्रोत्सवात किमान एका कुमारिकेचं पूजन व्हायलाच हवं, असं ज्योतिषी सांगतात. या पूजेचं एवढं काय महत्त्व आहे, जाणून घेऊया.
advertisement
कन्या पूजनासाठी 2 ते 9 वर्षे वयोगटातील कुमारिकांना घरी बोलवलं जातं. विशेषत: नवरात्रीच्या अष्टमीला किंवा नवमीला कन्या पूजन करतात. यंदा 11 ऑक्टोबरला नवरात्रोत्सवाची अष्टमी आणि 12 तारखेला नवमी तिथी आहे. त्यानंतर दशमी तिथीला दसरा साजरा होईल.
कुमारिका पूजनाशिवाय देवीचं पूजन पूर्ण होतच नाही, असं सांगितलं जातं. काही ठिकाणी नवरात्रीत चक्रपूजा नावाचा एक विधी पार पडतो. त्यात कुमारिकेला भवानी म्हणून बसवून तिची पूजा केली जाते. यात भोजनाचा पहिला मान कुमारिकेचा असतो. त्यानंतरच सर्वजण जेवतात. यावेळी एका लहान मुलालाही पूजलं जातं. त्याला भैरव किंवा बटुक म्हणतात, जो देवीचा रक्षक असतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, केवळ सुख मिळावं यासाठी नाही, तर सुखासह शांती, समृद्धी, विद्या, लक्ष्मी प्राप्त व्हावी यासाठी ही पूजा केली जाते. एकूणच घराची सर्वांगीण भरभराट व्हावी म्हणून कन्या पूजेला दुर्गा देवीच्या 9 रूपांची मुलींच्या रूपात पूजा केली जाते. पौराणिक विद्या अभ्यासक सूरज सदानंद म्हशेळकर यांनी ही माहिती दिली आहे.
सूचना: इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.