TRENDING:

Nag Panchami 2025: महाराष्ट्रातलं असं गाव जिथे महिला नागाला मानतात भाऊ, दरवर्षी मिरवणूकही निघते, पण आता गावात पेटला नवा वाद!

Last Updated:

Nag panchami 2025: जिवंत नागाच्या पूजेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या या गावात नागाची पूजा करण्यास मनाई आहे. त्यामुळे नागप्रेमी अलीकडे जिवंत नागाऐवजी प्रतीकात्मक नागाची पूजा करतात. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: सांगलीच्या बत्तीस शिराळ्यास नागपंचमीची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. जिवंत नागाच्या पूजेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या शिराळ्यात 2002 च्या शासन नियमानुसार जिवंत नागाची पूजा करण्यास मनाई आहे. त्यामुळे शिराळकर नागप्रेमी अलीकडे जिवंत नागाऐवजी प्रतीकात्मक नागाची पूजा करतात.
advertisement

काळानुसार इतर उत्सवांप्रमाणेच सांगलीच्या बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीच्या उत्सवाचे स्वरूप देखील बदललेले दिसते. शिराळ्यातील पारंपरिक नागपंचमीच्या बदलत्या उत्सवास शिराळा शहरातील ज्येष्ठ नागरिक संघटनेकडून विरोध होत आहे.

नागपंचमीच्या उत्सवास ज्येष्ठ नागरिकांचा विरोध

ज्येष्ठ नागरिक संघटनेचे शिराळा तालुका अध्यक्ष जयसिंग गायकवाड सांगतात, बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. दहाव्या शतकात गोरक्षनाथ महाराज शिराळ्यात आले होते. त्यावेळी पंचमीच्या दिवशी ते एका घरी भिक्षा मागायला गेले. ते घर महाजन नावाच्या व्यक्तीचे होते. भिक्षा जरी मागितली असली तरी बराच वेळ झाला त्यांना भिक्षा मिळाली नाही. नंतर त्या घरातून गृहिणी बाहेर आली आणि तिने महाराजांना भिक्षा दिली. भिक्षा द्यायला वेळ का झाला असे गोरक्षनाथांनी त्या गृहिणीला विचारले. त्यावर आपण देव्हाऱ्यातील मातीच्या नागाची पूजा करत असल्याचे त्या गृहिणीने सांगितले. तू जिवंत नागाची पूजा करशील का? असं गोरक्षनाथांनी तिला विचारले. त्यावर त्या गृहिणीने त्यांना  होय असे उत्तर दिले. तेव्हापासून पंचमीच्या दिवशी बत्तीस शिराळ्यात नागाची पूजा केली जाते.

advertisement

अल्पभूधारक शेतकऱ्यानं डोकं चालवलं, अर्ध्या एकरात लावली पैशाची बाग, आता लाखात कमाई!

बत्तीस शिराळ्यातील महिला नागाला आपला भाऊ मानतात आणि त्याच्यासाठी उपवास करतात. त्या दिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये यासाठी स्वयंपाकगृहात काही चिरले जात नाही किंवा तळले जात नाही. नागपंचमीच्या निमित्ताने नागाची पूजा करून त्याला वेगवेगळ्या भाज्यांचा नैवेद्यही दाखवला जातो.

advertisement

न्यायालयाने बंदी घालण्यापूर्वी बत्तीस शिराळ्यात मोठ्या उत्साहाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात नागपंचमी साजरी केली जायची. प्रथम गावातील अंबामाता मंदिरात नागाची पूजा केली जायची. नंतर प्रत्येकाच्या घरात पूजा केली जायची. या दिवशी नागाच्या प्रतिमेची आणि जिवंत नागांची ट्रॅक्टरमधून मिरवणूकही काढली जायची. बत्तीस शिराळ्यातील नागपंचमी पाहण्यासाठी राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक उपस्थिती लावत असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक जयसिंग गायकवाड यांनी सांगितले.

advertisement

असे बदलले उत्सवाचे स्वरूप

पूर्वी पारंपरिक वाद्यांच्या गजरात बैलगाडीतून जिवंत नागांची मिरवणूक काढली जात होती. यावेळी गावातील माता-भगिनी नागाला भाऊ मानून मिरवणुकीमध्ये श्रद्धेने त्याची पूजा करीत होत्या

जत्रा, प्रदर्शने आणि स्पर्धा यातून मनोरंजन होत होते. जिवंत नागाच्या पूजेला, विविध स्पर्धा आणि प्रदर्शनांना सन 2002 पासून बंदी घालण्यात आली. यानंतर मात्र प्रतीकात्मक नागाची पूजा होऊ लागली. आणि मनोरंजनासाठी मिरवणुकीतील पारंपरिक वाद्यांची जागा आधुनिक डीजे-डॉल्बीने घेतली

advertisement

गावातील 70-75 सार्वजनिक मित्र मंडळांकडून मोठमोठे डॉल्बी सांगितले जातात. कोणतेही नियम न पाळता आवाजाच्या सर्व मर्यादा मोडत नागपंचमीचा दिवस अतिशय वाईटपणे साजरा केला जात आहे, असे मत शिराळा शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.  

आरोग्यास धोका

डॉल्बी क्षेत्रातील नावाजलेले वेगवेगळ्या प्रदेशातील सत्तरहून अधिक डॉल्बी शिराळा शहरांमध्ये नागपंचमीच्या निमित्ताने वाजत असतात. वयोवृद्ध लोक, गर्भवती महिला, लहान मुले, हृदयविकारग्रस्त नागरिक तसेच गंभीर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना नागपंचमीच्या दिवशी गाव सोडून बाहेर सुरक्षित, शांत ठिकाणी जावे लागते. तसेच शिराळा शहरातील सर्वच नागरिकांना डॉल्बीचा त्रास होत असून नागपंचमी नंतर अनेकांना कानासंबंधित तक्रारी झाल्याच्या घटना घडल्याचे स्थानिक नागरिक सांगतात

ही आपली परंपराच नव्हे

बत्तीस शिराळा शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मते; जिवंत नागाची श्रद्धेने पूजा करणे आणि त्यांना कोणतीही इजा न होता पुन्हा त्यांच्या मूळ अधिवासात सुखरूप सोडून देणे ही आपली परंपरा आहे. नागपंचमी उत्सवाच्या नावाखाली कोणत्याही मर्यादा न पाळता वाजणारे डीजे डॉल्बीनृत्यांगनाव्यसने हे समाजासाठी अत्यंत घातक चित्र आहे. अशा चुकीच्या गोष्टींना शासन आणि प्रशासनाने आळा घालण्याची गरज, ज्येष्ठ नागरिक संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.

जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा पुन्हा सुरू करण्यासाठी इच्छुक असणारे नागरिक नागपंचमीच्या बदलत्या उत्सव स्वरूपास जाहीर विरोध करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून फक्त डीजे-डॉल्बी आणि नाच-गाण्यांमध्ये शिराळ्यातील नागपंचमी अडकली असून ही आपली परंपरा नाही, असे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच मूळ परंपरेपासून दूर नेणारे वातावरणयातून पसरणारा चुकीचा संदेश आणि सर्व नियम गुंडाळून वाजणारे डॉल्बी हे नागरिकांच्या आरोग्यास अत्यंत हानिकारक असल्याने अशा चुकीच्या गोष्टींना आळा घालण्याची गरज ज्येष्ठ नागरिक संघटनेने प्रशासनासमोर जाहीर निवेदनाद्वारे पोहोचवली आहे. यावर प्रशासनाची नेमकी काय भूमिका असेल यावर यंदाच्या नागपंचमीचा उत्साह अवलंबून राहणार आहे.

मराठी बातम्या/अध्यात्म/
Nag Panchami 2025: महाराष्ट्रातलं असं गाव जिथे महिला नागाला मानतात भाऊ, दरवर्षी मिरवणूकही निघते, पण आता गावात पेटला नवा वाद!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल