नाशिक: कुंभमेळ्याचं ठिकाण असल्यानं नाशिकचं विशेष धार्मिक महत्त्व आहे. तसेच प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेलं शहर म्हणून नाशिकला ओळखळं जातं. रामायणात उल्लेख असलेली काही ठिकाणं आजही या ठिकाणी आहेत. गोदावरी काठची ही ठिकाणं पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येनं हिंदू बांधव येत असतात. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वनवासात असताना याच पंचवटी परिसरातील तपोवनात वास्तव्यास असल्याचं सांगितलं. जातं. याबाबत आपण नाशिकमधील पुजारी विनायक महाशब्दे यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
प्रभू रामाच्या वनवासाची जागा
दशरथ राज्याच्या वचनानुसार भगवान राम, लक्ष्मण आणि सीता माता हे वनवासाला निघाले. या वनवासाच्या काळात त्यांनी जास्त काळ नाशिकमध्ये घालव्याचे सांगितले जाते. पंचवटी परिसरात ते वास्तव्यास होते. फार पूर्वीपासून गोदावरी काठावर पाच जुने वटवृक्ष होते. त्यामुळे या ठिकाणाला पंचवटी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दंडकारण्य तपोवन देखील आहे. इथंच कपिल मुनींनी तप करून कपिला नदीला पृथ्वीतलावर आणल्याचं सांगतिलं जातं. आजही या ठिकाणाला महत्त्व असल्याचं पुजारी सांगतात.
वय अवघं 7 आणि सुवर्णपदकांचं शतक, पुण्यातल्या लेकीची प्रत्येकाला अभिमान वाटेल अशी कामगिरी
इथंच कापलं शूर्पनखेचं नाक
रामायण कथेच्या अनुसार राम आणि रावण यांच्यात झालेल्या युद्धाचं मुख्य कारण लक्ष्मणानं शूर्पनखेचं नाक कापलं, हे सुद्धा होतं. ज्या ठिकाणी शूर्पनखेचं नाक कापलं ती जागा पंटवटीत असल्याचं सांगितलं जातं. तसेच जिथून सीता मातेचं अपहरण झालं ती जागाही याच ठिकाणी आहे. वनवासात असताना श्रीरामाने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या साक्षीने सीता मातेला अग्नी कुंडाजवळ सुरक्षित ठेवले होते. त्यामुळे हे ठिकाण रामायणातील महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार असल्याचंही पूजारी सांगतात.
गोदावरी कपिला नदीचा संगम
दक्षिण वाहिनी गोदावरी आणि कपिला नदीचा संमग याच ठिकाणी आहे. तसेच लक्ष्मण रुपी शेष नागाचे पहिले मंदिर देखील इथेच आहे. त्यामुळे या जागेला महत्त्व आहे, असं पुजारी सांगतात. तुम्ही देखील नाशिक फिरण्यासाठी येण्याच्या विचारात असाल तर पंचवटीपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या तपोवनाला नक्की भेट द्या.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)