काय आहे नेमकी परंपरा
कित्येक वर्षांपासून अंबाबाई देवीचा नगर प्रदक्षिणा सोहळा शारदीय नवरात्रौत्सव काळात अष्टमीला पार पडत आलेला आहे. ‘नारायणी नारायणी’ असा जयघोष, फुलांच्या पायघड्या आणि रांगोळ्यांनी सजलेला प्रदक्षिणा मार्ग, विद्युत रोषणाईने उजळून गेलेला परिसर, भालदार चोपदारांचा लवाजमा, फुलांनी सजलेल्या रथावर आरुढ अंबाबाई देवीची उत्सवमूर्ती आणि त्यावर हजारोंच्या संख्येनने उपस्थित भाविकांकडून केला जाणारा फुलांचा वर्षाव अशा मंगलमय वातावरणात दरवर्षी अष्टमीच्या रात्री अंबाबाईची नगरप्रदक्षिणा होत असते.
advertisement
अंबाबाई जाते त्र्यंबुली देवीच्या भेटीला; का फोडला जातो कोहळा पाहा Video
दरवर्षीप्रमाणे जागरादिवशी फुलांनी सजवलेल्या शार्दुल वाहनावर श्री अंबाबाईची उत्सवमूर्ती ठेवण्यात येत असते. दुपारनंतर महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडप, मिरजकर तिकटी आदी प्रदक्षिणा मार्ग परिसर वाहतुकीसाठी बंदच केला जातो. या मार्गावर काही ठिकाणी फुलांच्या पायघड्या अंथरण्यात येत असतात. तर ठिकठिकाणी अनेक हौशी कलाकारांसह भाविक आकर्षक रांगोळ्या रेखाटत असतात.
तोफेच्या सलामीनंतर महाद्वारातून पालखी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडते. मार्गावर बऱ्याच ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई आणि प्रकाशझोताने मार्ग उजळून निघतो. अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी मार्गावर दुतर्फा मोठी गर्दी असते. देवी आपल्या वाहनातून महाद्वार रोडवरुन गुजरी, भाऊसिंगजी रोडमार्गे भवानी मंडपात येते. यावेळी मार्गावर विविध संस्था तसेच भाविकांच्यावतीने ठिकठिकाणी प्रसादाचे आयोजन केले होते. गुजरी येथे अंबाबाईची भव्य प्रतिकृती साकारकण्यात आली होती. भवानी मंडपातून नंतर मिरजकर तिकटीमार्गे बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोडवरून पुन्हा महाद्वार चौकात पालखी येत असते. नगर प्रदक्षिणा सोहळ्यामुळे रात्री उशिरापर्यंत मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असते, अशी माहिती मंदिर अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी दिली आहे.
करवीर निवासिनी अंबाबाई महिषासुरमर्दिनीच्या रुपात, पाहा अष्टमीची खास पूजा, Video
का होतो अंबाबाई देवीचा नगरप्रदक्षिणा सोहळा?
नगरीतल्या नागरिकांना देवी अंबाबाई दर्शन देण्यासाठी बाहेर पडण्याचा सोहळा म्हणजेच नगर प्रदक्षिणा सोहळा आहे. पंचमीच्या दिवशी कोल्हासुराचा संहार झाल्यानंतर आता सर्व व्यवस्थित आहे, घाबरण्याचे कारण नाही, याबाबत आश्वस्त करण्यासाठी देवी करवीर नगरीतल्या सर्व भक्तजणांना दर्शन देण्यास बाहेर पडत असते. तेव्हा करवीर नगरीच्या जुन्या वाटेवरून ती भ्रमण करते. ही परंपरा गेली कित्येक शतकांपासून सुरू आहे, असेही ॲड. प्रसन्न मालेकर यांनी सांगितले.
दरम्यान, यंदाही मोठ्या जल्लोषी आणि भक्तिमय वातावरणात अंबाबाई देवीचा हा अलौकिक सोहळा पार पडला. हजारो नयनांनी हा अप्रतिम क्षण आपल्या डोळ्यात साठवत देवीचे दर्शन घेतले आणि पुन्हा पुढच्या वर्षीच्या या क्षणाची वाट पाहू लागले.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)