इतिहासाच्या नोंदीनुसार, हे मंदिर पेशवेकालीन काळाशी संबंधित आहे. सुमारे 1810 च्या सुमारास बाजीराव पेशवा द्वितीय यांच्या काळात या मारुतीची नोंद आढळते. त्या काळी या परिसरात भिकारदास नावाच्या व्यक्तीचा बंगला आणि मोठी बाग होती. या बागेजवळच मारुतीची मूर्ती असल्यामुळे त्या व्यक्तीच्या नावावरून या मंदिराला भिकारदास मारुती असे नाव पडले, असे इतिहास अभ्यासक सुप्रसाद पुराणिक यांनी सांगितले आहे.
advertisement
सदाशिव पेठ हा भाग आज मोठ्या प्रमाणात गजबजलेला असला, तरी पूर्वी येथे अनेक बागा आणि मोकळी जागा होती. टिळक रोड परिसर, नातू बाग आणि पर्वती तळ यांच्या मधील भागात भिकारदास यांची बाग असल्याची नोंद आढळते. तसेच पुणे शहराची पेशवे काळातील वेसदेखील याच मारुती मंदिराजवळ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मंदिराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या मंदिरातील मारुतीची मूर्ती दक्षिणमुखी असून सुमारे तीन ते साडेतीन फूट उंच आहे. मूर्ती उभी असून हनुमानाची मान उजव्या बाजूला किंचित झुकलेली दिसते. विशेष म्हणजे, या मारुतीच्या डोळ्यांमध्ये एक वेगळे जिवंतपण जाणवते, असे अनेक भाविक सांगतात. त्यामुळे भाविकांच्या श्रद्धेत या मंदिराला विशेष स्थान मिळाले आहे.
मंदिरासमोरच असलेले सदावर्ते राम मंदिर हे देखील ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. या मंदिरात पूर्वी गोंदवलेकर महाराज येत असत, अशी परंपरागत माहिती स्थानिकांकडून सांगितली जाते.
सध्या सदाशिव पेठ परिसर पुण्यातील एक प्रसिद्ध ठिकाण बनला आहे. मात्र या गजबजलेल्या भागातही भिकारदास मारुती मंदिराने आपली ऐतिहासिक ओळख आणि परंपरा जपली आहे. विशेषतः शनिवारी येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सुमारे 200 ते 215 वर्षांचा इतिहास असलेले हे मंदिर आजही पुणेकरांच्या श्रद्धा आणि इतिहासाचा महत्त्वाचा भाग म्हणून ओळखले जाते.





