TRENDING:

White Shivling Sangli: दुर्मिळ पांढरे शिवलिंग अन् गूढ ध्यानगृह, नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिराशी होते तुलना

Last Updated:

शेकडो वर्षांपूर्वीच्या या गूढ मंदिराबद्दल वेगवेगळ्या काळातील अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. श्री पशुपती मंदिराच्या सांस्कृतिक वारशाविषयी लोकल 18च्या प्रतिनिधींनी रेठरेहरणाक्ष गावातील रहिवासी मोहन जाधव यांच्याकडून याबाबत अधिक माहिती जाणून घेतली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: सांगलीतील रेठरेहरणाक्ष येथील पशुपती मंदिर हे महादेवाच्या अति प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. कृष्णा नदीच्या काठी काळ्या पाषाणात उभारलेल्या या मंदिरातील शाळुंका (शिवलिंगाचा भाग) मात्र पांढरी शुभ्र आहे. मंदिराच्या गर्भगृहाखालील भूमिगत ध्यानगृह तसेच भिंतींवरील शरभाच्या शिल्पांनी मंदिराचे ऐतिहासिक व पुरातत्त्वीय महत्त्व अधोरेखित होते. या गूढ मंदिराची तुलना नेपाळ आणि वाराणसीमधील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराशी केली जाते.
advertisement

शेकडो वर्षांपूर्वीच्या या गूढ मंदिराबद्दल वेगवेगळ्या काळातील अनेक अख्यायिका सांगितल्या जातात. श्री पशुपती मंदिराच्या सांस्कृतिक वारशाविषयी लोकल18च्या प्रतिनिधींनी रेठरेहरणाक्ष गावातील रहिवासी मोहन जाधव यांच्याकडून याबाबत अधिक माहिती जाणून घेतली.

महादेवाने अर्थात शंकराने काळानुसार अनेक अवतार घेतल्याचे मानले जाते. शिव पुराणानुसार शंकराचे एकूण 19 अवतार झाले आहेत. 'शरभवतार' त्यापैकीच एक आहे. नृसिंहाचा राग शांत करण्यासाठी महादेवाने हा 'शरभवतार' घेतल्याचे मानले जाते. शरभवतारामध्ये महादेवाचे शरिर अर्धे हरीण आणि बाकीचे शरभ पक्ष्याचे आहे. पुराणातील वर्णनानुसार, शरभ हा आठ पायांचा पक्षी असून सिंहापेक्षा बलवान होता. हा शरभावतार म्हणजेच 'श्री पशुपती' आहे.

advertisement

Shiv Temple: सोमनाथ ते रामेश्वरम, बाराही ज्योतिर्लिंगाचे दर्शन वेरूळच्या एकाच मंदिरात, Video

शरभावताराची कथा

पुराणात महादेवाच्या शरभवताराची जी कथा आहे, त्यानुसार विष्णूने हिरण्यकशिपूला मारण्यासाठी नृसिंहावतार घेतला होता. हिरण्यकश्यपूला मारूनही नृसिंहाचा राग शांत झाला नाही तेव्हा इतर देवता महादेवाकडे गेल्या आणि नृसिंहाचा राग शांत करण्याची विनंती केली. तेव्हा महादेवाने शरभावतार घेतला आणि नृसिंहाकडे जाऊन त्यांची स्तुती केली. तरीदेखील नृसिंहाचा राग शांत झाला नाही. हे बघून शरभ रूपातील महादेवाने नृसिंहाला आपल्या शेपटीत गुंडाळले आणि आकाशात भरारी घेतली. त्यानंतर नृसिंहाचा राग शांत झाला.

advertisement

मंदिराची रचना

सांगलीतील वाळवा तालुक्यातील रेठरेहरणाक्ष गावातून दक्षिण दिशेला कृष्णा नदी वाहते. याच कृष्णेच्या रम्य काठावर काळ्या पाषाणातील श्री पशुपती मंदिर आहे. मंदिराची रचना तीन भागांमध्ये असल्याचे दिसते. मंदिरा समोरील पटांगणामध्ये पुरातन दगडी दीपमाळ आहे. दिपमाळेवर गरुड, मारूती अशी शिल्प आहेत. अलीकडच्या काळात पत्र्याचे नवे सभागृह बांधले गेले आहे. पुरातन सभागृह आणि गर्भगृह हे दगडातमध्ये कोरलेले आहे. सभामंडपामध्ये एकाच शीळेमध्ये कोरलेला नंदी आहे. गाभाऱ्याच्या दगडी प्रवेशद्वारावर कोरीव नक्षीकाम आहे. तसेच प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याला खाली आणि वरती कीर्तीमुख दिसते. दोन्ही बाजूस शस्त्रधारी द्वारपाल आणि दोन हत्तींची शिल्पे आहेत. सभा मंडपामध्ये एका बाजूस श्री गणेशाची मूर्ती तर दुसऱ्या बाजूस देवीची मूर्ती आहे.

advertisement

अत्यंत दुर्मिळ असे पांढरे शिवलिंग

साधारण सर्वच शिव मंदिरांमध्ये काळ्या रंगाचे शिवलिंग पाहायला मिळते. परंतु, सांगलीतील या पशुपती मंदिरामध्ये महाराष्ट्रातील एकमेव पांढरे शिवलिंग आहे. संपूर्ण काळ्या पाषाणात उभारलेल्या या मंदिरातील पिंडीवरील शाळुंका पांढरी शुभ्र असल्याने मंदिराचं वेगळेपण अधोरेखित होते.

Temple News: निसर्ग अन् शिवभक्तीचा अनोखा संगम, श्रीरामांनी केलं होतं इथं वास्तव्य, Video

advertisement

गूढ उर्जेने भारलेलं ध्यानगृह

श्री पशुनाथ मंदिराच्या गर्भगृहाखालील भाग अतिशय गूढ वाटतो. शिवलिंगाच्या बाजूला एक भुयारी मार्ग आहे. शिवलिंगाच्या अगदी खालोखाल भूमिगत ध्यानगृह आहे. साधारणपणे चार बाय चारचे हे ध्यानगृह अतिशय गूढ आहे. भाविकांना याबाबत आकर्षण आणि आश्चर्य वाटते.

स्थापत्यशास्त्राचा नमुना

मंदिर परिसरामध्ये आत्तापर्यंत एकही शिलालेख आढळलेला नाही. त्यामुळे मंदिराबाबत ठोस ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. तरीही मंदिराच्या स्थापत्य रचनेवरून काही अंदाज वर्तवले जातात. श्री पशुपती मंदिराच्या बाहेरील बाजूस दगडी भिंतींवरती शरभशिल्पे आहेत. तसेच गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या नक्षीकामामध्ये दोन्ही बाजूस ऋषीमुनींची शिल्पं आहे. या या शिल्पांमध्ये ऋषीमुनींनी दोन्ही बाजूस केस सांभार केलेला आहे. केशरचनेच्या या प्रकारावरून ते पराशर ऋषि यांचे शिल्प असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

कृष्णेचा डोह

रेठरेहरणाक्ष येथील कृष्णेचा डोह रमणीय आहे. कृष्णा नदीच्या रम्य काठावर वसलेले हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि भक्तांसाठी एक खास आकर्षण आहे. विशेष म्हणजे इथून वाहणारी कृष्णा नदी ही दक्षिण वाहिनी आहे. रेठरेहरणाक्ष आणि बिचुद गावातील शेत जमिनीमध्ये शांत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पशुपती मंदिराचे सौंदर्य पावसाळ्यामध्ये अधिक खुलते.

भाविकांचे श्रद्धास्थान

हे मंदिर रेठरेहरणाक्ष आणि पंचक्रोशीतील अनेक शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराविषयी माहिती असलेले अनेक भाविक याठिकाणी येतात. श्रावण महिन्यामध्ये तसेच महाशिवरात्रीला याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. रेठरेहरणाक्ष गावचे ग्रामस्थ श्री पशुपती मंदिरामध्ये पारायण सोहळा करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी पारायण सप्ताहाची सांगता करून यात्रा साजरी केली जाते.

श्री पशुपती मंदिराकडे जाण्याचे मार्ग

पशुपती मंदिराकडे जाण्यासाठी सांगली एसटी स्थानकावरून एसटी सेवा आहे. श्री पशुपतीचे मंदिर कृष्णकाठी शेतामध्ये असल्याने थेट मंदिरापर्यंत एसटी बस जात नाही. वैयक्तिक किंवा खासगी वाहनाने जावे लागते. तासगाव-कराड या बसने पशुपती फाट्यापर्यंत प्रवास करता येतो. तासगाव-कराड या मार्गावर ताकारीच्या पुढे डाव्या बाजूस श्री पशुपती हे क्षेत्र आहे. तर कोल्हापूर-पुणे रेल्वे मार्गावर ताकारी रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनवर उतरून बस किंवा खासगी रिक्षाने 9 किलोमीटर प्रवास करून पशुपती मंदिरात जाता येते. सांगलीपासून रेठरेहरणाक्ष हे गाव 50 किलोमीटर अंतरावर आहे. श्री सागरेश्वर मंदिरापासून हे ठिकाण सुमारे 12 किलोमीटर आहे.

श्री पशुपतिनाथ मंदिर पांडव काळामध्ये एका रात्रीत बांधले गेल्याची आख्यायिका आहे. या मंदिराचा संबंध नाथसंप्रदायाशी आहे, असा देखील मत प्रवाह आहे. मंदिर परिसरापासून काही अंतरावर श्री नृसिंह मंदिर, श्रीराम मंदिर, मच्छिंद्रगड आणि नाथ संप्रदायाशी संबंधित काही ठिकाणं असल्याने अनेक अंदाज वर्तवले जातात. नेमक्या आणि ठोस पुराव्यांअभावी पशुपती मंदिराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्रकाशात येऊ शकलेलं नाही.

पुरातनशास्त्रातील तज्ज्ञांनी श्री पशुपती मंदिराला भेट देऊन स्थापत्य शैलीचा अभ्यास करावा. त्यातून ठोस पुरावे आणि नवी माहिती शोधावेत, अशी अपेक्षा पशुपतीच्या भाविकांना आहे. पशुपतीच्या जगभरामध्ये असलेल्या दुर्मिळ मंदिरांपैकी हे मंदिर असल्याने मंदिराचे सांस्कृतिक महत्त्व प्रकाशात येणे आवश्यक वाटते.

मराठी बातम्या/अध्यात्म/
White Shivling Sangli: दुर्मिळ पांढरे शिवलिंग अन् गूढ ध्यानगृह, नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिराशी होते तुलना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल