कोल्हापूर : रंगीबेरंगी फुलांची अखंड उधळण, मानाच्या गायकांनी सादर केलेली गायनसेवा, पोलीस वाद्यवृंदांच्या सुमधुर स्वरांची उधळण, पायघड्या अंथरण्यात सेवेकऱ्यांची उडालेली धांदल आणि भाविकांच्या मुखातून आपसूक उमटलेले स्वर...अंबा माता की जय! अशा उत्साही, भक्तिमय वातावरणात करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा पालखी सोहळा 10 ऑक्टोबर रोजी रात्री धुमधडाक्यात पार पडला.
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवात पहिल्या दिवसापासून विजयादशमीपर्यंत अंबाबाईचा पालखी सोहळा साजरा होतो. यावेळी मंदिर परिसरात आणि बाहेरदेखील हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित असतात.
advertisement
पालखीची सुरुवात कशी होते?
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची उत्सवमूर्ती रात्री साडेनऊ वाजता पालखीत विराजमान होते. त्यानंतर पालखी आणि देवीचं पूजन होतं. मग चोपदाराची ललकारी होताच पालखी सोहळ्यास सुरुवात होते. या पालखीदरम्यान मानाचे गायक आपली गायनसेवा सादर करतात. यावेळी पालखी मंदिर प्रदक्षिणेस जात असताना भाविकांकडून अखंड पुष्पवृष्टी होते. त्यानंतर गरुड मंडपासमोर पालखी काहीवेळ थांबते. यादरम्यान मान्यवरांकडून मानवंदना दिली जाते. नंतर पालखीतील देवीची मूर्ती गरुड मंडपातील सदर सिंहासनावर काही क्षण विसावा घेते. गरुड मंडपातील सदरेवर विराजमान झाल्यानंतर तोफेची सलामी दिली जाते. मग रात्री साडेदहा वाजता पालखी पुन्हा मंदिरात परतते. यावेळी आरतीने पालखी सोहळ्याची सांगता होते.
सप्तमीला श्री अंबाबाईची दुर्गादेवी रुपात पूजा:
शारदीय नवरात्रोत्सवाच्या सप्तमीला, 10 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची दुर्गादेवी रुपात पूजा बांधण्यात आली. अंबाबाईने दुर्गादेवीच्या रुपात भाविकांना दर्शन दिलं. सर्वश्रेष्ठ निर्गुण परब्रम्ह शक्तीच्या माया रुपाचं प्रथम स्वरूप म्हणजे दुर्गादेवी. सर्व देवतांचे कार्याकारण अवतार जिच्या इच्छेने, जिच्यापासून निर्माण झाले, जिच्या प्रभावाने राहिले, जिच्या स्वरुपात लय पावले तीच महामाया आदिशक्ती दुर्गा आहे.
दरम्यान, 11 ऑक्टोबरला रात्री साडेनऊ वाजता देवी फुलांनी सजलेल्या वाहनात विराजमान होऊन नगरप्रदक्षिणेला मार्गस्थ होईल. त्यानंतर महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडपात तुळजाभवानी देवीची भेट, गुरुमहाराज वाडा, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार मार्गे वाहन मंदिरात परतेल. गरुड मंडपात धार्मिक विधी, विश्रांती झाल्यानंतर अंबाबाईची उत्सवमूर्ती गाभाऱ्यात प्रवेश करते. दरम्यान, नवरात्रोत्सवात अष्टमीला विशेष महत्त्व असून या दिवशी देवीने महिषासुराचा वध केल्याने रात्री जागर केला जातो.