उत्तरायणाची सुरुवात: देवांचा 'दिवस'
मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करतो. याच दिवसापासून सूर्याचे 'उत्तरायण' सुरू होते. हिंदू शास्त्रानुसार, वर्षाचे दोन भाग असतात उत्तरायण आणि दक्षिणायन. उत्तरायणाला देवांचा दिवस मानले जाते, तर दक्षिणायनाला देवांची रात्र. त्यामुळे मकर संक्रांतीपासून शुभ आणि मांगलिक कार्यांसाठी अनुकूल काळ सुरू होतो.
advertisement
शनी आणि सूर्याचे मिलन
पौराणिक कथेनुसार, सूर्यदेव आणि त्यांचे पुत्र शनिदेव यांचे संबंध फारसे मधुर नव्हते. मात्र, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव स्वतः आपल्या मुलाच्या म्हणजेच शनीच्या मकर राशीत त्याला भेटायला जातात. हा दिवस 'पितृ-पुत्र' भेटीचे प्रतीक मानला जातो. त्यामुळेच या दिवशी जुने हेवेदावे विसरून नात्यात गोडवा निर्माण करण्यासाठी 'तिळगूळ' वाटण्याची परंपरा आहे.
भीष्म पितामहांचे प्राणार्पण
महाभारतात भीष्म पितामहांना इच्छामरणाचे वरदान होते. जेव्हा ते शरपंजरी पडले होते, तेव्हा त्यांनी स्वतःचे प्राण सोडण्यासाठी उत्तरायणाची म्हणजेच मकर संक्रांतीची वाट पाहिली होती. असे मानले जाते की, या शुभ काळात मृत्यू आल्यास मोक्षप्राप्ती होते आणि व्यक्ती जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होते.
वैज्ञानिक आणि आरोग्यदायी महत्त्व
मकर संक्रांत हा सण कडाक्याच्या थंडीत येतो. या काळात शरीराला उष्णतेची गरज असते. तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ उष्ण प्रकृतीचे आहेत. या दिवशी तिळाचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि त्वचा कोरडी पडण्यापासून वाचते. तसेच, उत्तरायणापासून दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते, ज्यामुळे निसर्गात चैतन्य येते.
अंधाराकडून प्रकाशाकडे प्रवास
संक्रांती म्हणजे क्रांती किंवा बदल. हा दिवस अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देतो. सूर्याचा उत्तर दिशेकडे प्रवास सुरू होणे म्हणजे जीवनात सकारात्मकता आणि ज्ञानाचा प्रकाश येणे होय. म्हणूनच या दिवशी नदीत स्नान आणि दानधर्माला विशेष महत्त्व आहे.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
