काय आहे सध्याची पॉलिसी?
सध्या 10 प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव असलेला कोणताही क्रिकेटपटू राज्याच्या निवड समितीचा सदस्य होण्यासाठी अर्ज करू शकतो, पण त्याच्या निवृत्तीला किमान 5 वर्ष झाली पाहिजेत, असा नियम आहे. पण रहाणेच्या मते निवड समिती सदस्याची मानसिकता आणि त्याचा दृष्टिकोन सध्याच्या क्रिकेटसोबत जुळला पाहिजे.
पुजाराच्या चॅनलवर आला रहाणे
advertisement
चेतेश्वर पुजाराच्या युट्यूब चॅनलवर अजिंक्य रहाणे बोलत होता. 'खेळाडूंनी निवड समिताला घाबरू नये, मला निवड समितीबद्दल बोलायचं आहे, खासकरून देशांतर्गत क्रिकेटमध्ये. आपल्याकडे असे निवड समिती सदस्य असले पाहिजेत, जे अलीकडेच उच्च-स्तरीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. क्रिकेट ज्या पद्धतीने विकसित होत आहे, त्यामुळे निवड समितीची मानसिकता आणि विचारसरणी बदलांशी जुळवून घेणारी पाहिजे. खेळ विकसित होत आहे, 20-30 वर्षांपूर्वी क्रिकेट कसे खेळले जात होते, यावर आधारित निर्णय आपण आता घेऊ शकत नाही', असं रहाणे म्हणाला आहे.
आधुनिक क्रिकेट समजून घेणं महत्वाचे
'टी-20 आणि आयपीएलसारख्या फॉरमॅटमध्ये आधुनिक क्रिकेटपटूंची शैली समजून घेणं महत्त्वाचं आहे. शक्य तेवढे निवड समिती सदस्य सर्व राज्यांमधून असले पाहिजेत, खेळाडूंनी मुक्तपणे आणि निर्भयपणे क्रिकेट खेळलं पाहिजे', अशी प्रतिक्रिया रहाणेने दिली. चेतेश्वर पुजारा रहाणेच्या या मताशी अंशतः सहमत होता, पण या मुद्द्यावर त्याने अधिक संतुलित मत मांडले.
पुजारा काय म्हणाला?
'मोठ्या राज्यांसाठी हा नियम लागू केला जाऊ शकतो, कारण त्यांच्याकडे खूप पर्याय आहेत, पण माजी क्रिकेटपटू खूप आधी निवृत्त झाला आहे, ज्याचे रेकॉर्ड उत्कृष्ट आहेत आणि त्याला निवड समितीमध्ये यायचं असेल, तर त्याला तुम्ही संधीपासून वंचित ठेवू शकणार नाही', असं मत पुजाराने मांडलं. भारताच्या टेस्ट टीममध्ये निवड करताना स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीला महत्त्व दिलं पाहिजे, असंही रहाणे आणि पुजाराने सांगितलं.