पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाने 4 कॅच सोडले, तसंच बॉलिंगमध्येही भारतीय बॉलरचा खराब दिवस होता. टीम इंडियाचं ट्रम्प कार्ड असलेल्या जसप्रीत बुमराहने 4 ओव्हरमध्ये 45 रन दिले, तसंच त्याला एकही विकेट मिळाली नाही. तर वरुण चक्रवर्तीलाही एकही विकेट घेण्यात यश आलं नाही. 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर पहिल्यांदाच वरुण चक्रवर्तीला विकेट घेता आली नाही.
advertisement
भारताने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने पहिल्या 10 ओव्हरमध्ये 91 रन करून 1 विकेट गमावली होती, पण ड्रिंक्स ब्रेकनंतर शिवम दुबेने पाकिस्तानला दोन धक्के दिले. शिवम दुबेने ड्रिंक्स ब्रेकनंतर 11 बॉलमध्ये 2 विकेट घेतल्या. शिवम दुबेच्या या स्पेलमुळे भारताने पाकिस्तानला 171 रनवर रोखलं. शिवम दुबेने 4 ओव्हरमध्ये 33 रन देऊन 2 विकेट घेतल्या. शिवम दुबेचा स्पेल मॅचचा टर्निंग पॉईंट ठरल्याचंही कॅप्टन सूर्यकुमार यादव म्हणाला.
कशी सुधारली दुबेची बॉलिंग?
आयपीएलमध्ये सीएसकेकडून खेळणारा दुबे बहुतेक वेळा इम्पॅक्ट सब म्हणूनच खेळला. इम्पॅक्ट सब म्हणून वापरल्यामुळे दुबे फक्त बॅटिंगसाठीच यायचा. पण टीम इंडियाकडून खेळत असताना दुबे बॉलिंग प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कलसोबत नेटमध्ये घाम गाळत आहे. मॉर्ने मॉर्कलकडूनच दुबे स्लो बॉल कसा टाकायचा? हे शिकतोय. मॉर्ने मॉर्कल हा टीम इंडियाचा बॉलिंग प्रशिक्षक व्हायचा आधी पाकिस्तानचा बॉलिंग प्रशिक्षक होता. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपनंतर मॉर्कलने पाकिस्तानची साथ सोडली, त्यानंतर तो भारताचा प्रशिक्षक झाला. या सामन्यात मॉर्कलने पाकिस्तानचे कमजोर दुवे सांगून टीम इंडियाला मदत केली.
सूर्याकडून दुबेचं कौतुक
दरम्यान कर्णधार सूर्यकुमार यादवने शिवम दुबेचं कौतुक केलं. 'शिवम दुबेचा स्पेल टर्निंग पॉईंट ठरला. तो प्रॅक्टिस सेशनमध्ये बॉलिंगवर बरीच मेहनत घेत आहे. त्याला मॅचमध्ये कमीत कमी 2 ओव्हर टाकायच्या असतात, पण आज त्याला पूर्ण स्पेल टाकायची संधी मिळाली, त्यामुळे तो खूश होता', असं सूर्यकुमार यादव म्हणाला.