भारताविरुद्ध 7 विकेटने झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी टीम प्रचंड दबावाखाली आहे आणि खेळाडूही घाबरले आहेत. भारताविरुद्धच्या मागच्या 14 टी-20 सामन्यांमधला पाकिस्तानचा हा 11वा पराभव आहे, त्यामुळे टीमला मानसिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी डॉ. राहिल करीम पाकिस्तानी टीममध्ये सामील झाले आहेत.
डॉ. राहिल करीम यांच्याकडे एक दशकाहून अधिक काळ क्रीडा तसंच इतर क्षेत्रातील टीमसोबत काम करण्याचा अनुभव आहे. बुधवारी डॉ. राहिल करीम पाकिस्तानच्या टीममध्ये सामील झाले. आशिया कप संपेपर्यंत राहिल करीम पाकिस्तानच्या टीमसोबत राहतील. खेळाडूंना तणावातल्या मॅचचा सामना करण्यास मदत करणे तसंच नकारात्मकतेपासून दूर ठेवणं, हे राहिल करीम यांचं मुख्य काम असेल.
advertisement
पाकिस्तानी खेळाडू सोशल मीडियापासून दूर
मीडियाच्या प्रश्नापासून खेळाडूंना लांब ठेवण्यासाठी पीसीबीने मॅचआधीची पत्रकार परिषदही रद्द केली. हस्तांदोलन वाद आणि मागच्या पराभवानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाबद्दल प्रश्न टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानचा अगदी सहज पराभव केला, त्यानंतर आता सुपर-4 मध्येही दोन्ही टीमची लढत होणार आहे. आशिया कपमधील आव्हान टिकवण्यासाठी तसंच मागच्या पराभवाचा बदला घेण्याची संधी म्हणून पाकिस्तान या सामन्याकडे पाहत असेल.