सूर्यकुमारची मोठी घोषणा
टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं रात्री अडीच वाजता आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय सैन्य दलासाठी मोठी घोषणा केली. पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली. या पूर्ण स्पर्धेमधील प्रत्येक सामन्याची माझी मॅचची फी सैन्य दलाला देणार आहे. पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमारने सांगितले की, ही फक्त एक ट्रॉफी नाही, ही देशाच्या सन्मानाशी जोडलेली भावना आहे. आपले जवान सीमारेषेवर आपल्यासाठी लढतात, तर आम्ही मैदानावर लढतो. माझ्या दृष्टीने या विजयाचा खरा मान त्यांचाच आहे. सूर्यकुमारच्या या निर्णयाचं कौतुक सोशल मीडियावरुन जगभरातून केलं जातं आहे.
advertisement
ट्रॉफी घेण्यास नकार
भारतीय संघाने एशिया क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास ठाम नकार दिला. विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमारने स्पष्ट केले की ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय हा संपूर्ण संघाचा होता. कोणी सांगितलं नाही, पण आम्हाला वाटतं की विजेते संघाला ट्रॉफीचा सन्मान मिळायला हवा. मी क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यापासून कधीही असं पाहिलं नव्हतं की विजेत्या संघाला ट्रॉफी दिलीच जात नाही, असं होत नाही. ती मिळवण्यासाठी आपार मेहमत आहे. त्या विजयावर आणि ट्रॉफीवर आमचा हक्क होता, मात्र ती नकवी यांच्या हातून न स्वीकारणे हा टीम इंडियाचा निर्णय होता. त्यावर टीम ठाम होती.
पुरस्कार वितरणात गोंधळ आणि तणावपूर्ण वातावरण
सामन्यानंतरच्या पुरस्कार वितरणातही गोंधळ उडाला. सामना संपल्यानंतर जवळपास एक तास उशिरा पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सुरू झालं. भारतीय संघाने ना पदकं घेतली ना ट्रॉफी. टीम इंडियाने आधीच स्पष्ट केलं होतं की ते मोहसिन नकवींकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, टीम इंडिया व्यवस्थापनाने एसीसी अधिकाऱ्यांना विचारलं होतं की ट्रॉफी कोण देणार आहे. टीमने एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल जरोनी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यात हरकत नसल्याचं सांगितलं होतं, पण नकवी यांनी तो प्रस्ताव नाकारला आणि परिणामी टीम इंडियाने ट्रॉफी घेण्यास नकार दिला.
BCCI कडून 21 कोटी रुपयांचं बक्षीस
या ऐतिहासिक विजयाबद्दल BCCI ने टीमचं कौतुक करत 21 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. बीसीसीआय सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला आमच्या टीमचा अभिमान आहे. त्यांनी सुपर 4 टप्प्यात आणि फायनलमध्ये पाकिस्तानला हरवलं. तीनही सामने एकतर्फी झाले आणि आमच्या खेळाडूंनी देशाचं नाव उज्ज्वल केलं. हे बक्षीस खेळाडू आणि सहयोगी स्टाफमध्ये वाटण्यात येणार आहे.
भारताचा नववा एशिया कप किताब
भारताने एशिया कपच्या इतिहासात नवव्यांदा विजेतेपद पटकावत सर्वात यशस्वी टीम म्हणून आपलं वर्चस्व अधिक मजबूत केलं आहे. 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018, 2023 आणि आता 2025 मध्ये भारताने हा किताब जिंकला. त्यामुळे हा महारेकॉर्ड टीम इंडियाच्या नावावर झाला आहे.