जिओहॉटस्टारच्या शो मध्ये रोहित शर्मा बोलत होता. या कार्यक्रमात रोहितने टीमचं नेतृत्व करण्याच्या आव्हानांवर चर्चा केली. कर्णधार असताना अपेक्षा खूप असतात, तसंच तुमचा प्रत्येक निर्णय तपासला जातो. मोठ्या स्पर्धांपूर्वी निर्णय घेताना स्पष्टता आवश्यक असते, असं रोहित शर्मा म्हणाला आहे.
टीम सिलेक्शनबद्दल काय म्हणाला रोहित?
जागतिक स्पर्धांसाठी टीम अंतिम करणे ही कोणत्याही कर्णधारासाठी एक मोठी जबाबदारी आहे. वर्ल्ड कपआधी निवड समितीच्या बैठका आपल्या आत्मविश्वासाची आणि विवेकाची परीक्षा घ्यायच्या. टीम सिलेक्ट करताना वैयक्तिक गुणवत्तेपेक्षा टीम संतुलनाला प्राधान्य दिलं, असं रोहितने सांगितलं.
advertisement
2022 मध्ये श्रेयस अय्यरची आशिया कप आणि ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड झाली नाही. हा निर्णय फॉर्म किंवा क्षमतेवर आधारित नव्हता, त्याऐवजी टीमला अशा खेळाडूची आवश्यकता होती, जो बॅट आणि बॉल दोन्हीने योगदान देऊ शकतो, त्यामुळे श्रेयस अय्यरऐवजी दीपर हुड्डाची टीममध्ये निवड झाली. दीपक हुड्डा ऑलराऊंडर असल्यामुळे टीमला लवचिकता मिळाली. यामुळे श्रेयस नाराज झाला असेल, दीपकला आनंद झाला असेल, पण हीच पद्धत आहे, अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने दिली.
'फक्त निर्णय महत्त्वाचा नाही, तर तो कसा कळवला जातो, हे महत्त्वाचं आहे. राहुल द्रविड आणि मी श्रेयस अय्यरला वैयक्तिकरित्या याचं कारण सांगितलं. त्यानंतरच्या काळातही अशाच चर्चा झाल्या. मोहम्मद सिराजला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधून वगळलं, युझवेंद्र चहलला 2023 च्या वनडे वर्ल्ड कपममधून वगळलं, हे कठीण क्षण होते. टीमची गरज आणि 15 खेळाडूंचा सर्वोत्तम वापर कसा करायचा? हे मूलभूत तत्व सारखंच होतं. जोपर्यंत तुमच्याकडे योग्य कारण आहे आणि तुम्ही ते योग्यरित्या स्पष्ट करता, तोपर्यंत सगळं व्यवस्थित असतं', असंही रोहित म्हणाला आहे.
