पंजाब किंग्समध्ये माझा अपमान
प्रसिद्ध क्रिकेटपटू ख्रिस गेलने पंजाब किंग्स संघाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितलं की, पंजाब किंग्समध्ये असताना त्याला योग्य तो मान मिळाला नाही. एका वरिष्ठ खेळाडूप्रमाणे त्याच्याशी व्यवहार केला गेला नाही, उलट एका लहान मुलासारखे त्याच्याशी वागलं गेलं. त्यानंतर त्याने आयपीएलमधून आपला गाशा गुंडाळला होता.
advertisement
अनिल कुंबळेसमोर अक्षरशः रडला
ख्रिस गेलने सांगितलं की, या वागणुकीमुळे तो इतका निराश झाला होता की त्याला नैराश्यामध्ये (Depression) गेल्यासारखे वाटलं. त्याने सांगितले की, याबद्दल बोलताना तो प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासमोर अक्षरशः रडला होता, कारण त्याला खूप वाईट वाटले होते. संघाची व्यवस्थापन पद्धत आणि अनिल कुंबळे यांच्यामुळे तो निराश झाला होता.
केएल राहुलने थांबवण्याचा प्रयत्न केला पण...
ख्रिस गेलने पुढं सांगितलं की, त्याने जेव्हा संघ सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कर्णधार केएल राहुलने त्याला थांबण्याचा आग्रह केला होता आणि पुढच्या सामन्यात खेळण्याची खात्री दिली होती. पण, गेलने आपला निर्णय पक्का केला होता. त्याने राहुलला शुभेच्छा दिल्या, आपले सामान पॅक केले आणि तिथून निघून गेला. त्यानंतर ख्रिस गेल आयपीएलमध्ये खेळला नाही.
ख्रिस गेलची आयपीएल कारकीर्द
दरम्यान, युनिव्हर्स बॉस' (Universe Boss) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने आयपीएलमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. गेलने 2009 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला, पण त्याला फारसे यश मिळाले नाही. 2011 च्या लिलावात गेलला कोणीच विकत घेतले नाही, पण नंतर त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने (RCB) दुखापतग्रस्त डर्क नानेसचा पर्याय म्हणून संघात घेतले. हा त्याच्या कारकिर्दीतील एक टर्निंग पॉइंट ठरला. आरसीबीकडून खेळताना त्याने तुफान फलंदाजी केली आणि अनेक विक्रमांना गवसणी घातली. आरसीबीनंतर तो पंजाब किंग्स संघाचा भाग होता.