advertisement
मरीन ड्राईव्ह परिसरात एवढा जनसागर लोटला आहे की रोड शोसाठी जी बस वापरण्यात येणार आहे तीच बस गर्दीत अडकली आहे. याच बसमधून टीम इंडियाची मिरवणूक निघणार आहे. मुंबईमध्ये पाऊस पडत असतानाही चाहते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई विमानतळावर आल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या विमानाला फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी पाणी उडवून सलामी दिली आहे. तर दुसरीकडे मरीन ड्राईव्ह परिसरात या गर्दीत एक रुग्णवाहिका आली. मात्र, क्षणाचाही विलंब न लावता सर्वांनी या रुग्णवाहिकेला वाट करुन दिली. जिथं माणसाला चालायला जागा नाही. तिथं या गर्दीने गाडीला वाट करुन दिल्याने सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वाचा - टीम इंडियाला पाहण्यासाठी मरीन ड्राईव्हवर मुंग्यांसारखी गर्दी; पहिले Photo
खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव
29 जून रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने T20 वर्ल्डकपवर दुसऱ्यांदा नाव कोरलं. तेव्हापासून भारतीय चाहते चॅम्पियन संघाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. मायदेशी परतल्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंवरही बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. बीसीसीआयने 125 कोटी रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. टीम इंडियाचा रोड शो झाल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात भारतीय खेळाडूंना 125 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. या कार्यक्रमासाठीही वानखेडे स्टेडियम अवघ्या पाच ते सात मिनिटांमध्ये हाऊसफुल झालं आहे.
