वेस्ट झोनने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर वेस्ट झोनने 10 रनवरच सुरूवातीच्या 2 विकेट गमावल्या. ऋतुराजने मात्र एक बाजू लावून धरली आणि जलद गतीने रन केल्या. 72 बॉलचा सामना करून ऋतुराजने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं, यानंतर शतक पूर्ण करण्यासाठी त्याला 131 बॉल लागले.
थोडक्यात हुकलं द्विशतक
advertisement
शतक केल्यानंतरही ऋतुराज गायकवाड थांबला नाही, पुढच्या काही वेळात त्याने 150 रनही पूर्ण केले. यानंतर तो द्विशतक झळकवेल, असं वाटत होतं, पण सारांश जैनच्या उत्कृष्ट बॉलवर ऋतुराज 184 रनवर आऊट झाला. फक्त 16 रननी ऋतुराज गायकवाडचं द्विशतक हुकलं. या खेळीमध्ये त्याने 206 बॉलचा सामना केला, ज्यात 25 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट झोनचा स्कोअर 363/6 एवढा झाला आहे. तनुष कोटियन 65 रनवर आणि कर्णधार शार्दुल ठाकूर 24 रनवर नाबाद खेळत आहेत.
ऋतुराज गायकवाडने सेंट्रल झोनच्या दमदार बॉलिंगविरुद्ध हा स्कोअर केल्यामुळे त्याला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे. सेंट्रल झोनच्या बॉलिंगची धुरा खलील अहमद, दीपक चहर, यश ठाकूर, हर्ष दुबे आणि सारांश जैन यांच्यासारख्या स्टार बॉलर्सवर होती. या सर्व बॉलर्सवर ऋतुराज गायकवाडने आक्रमण केलं. ऋतुराजने सारांशविरुद्ध सर्वाधिक 55 आणि हर्ष दुबेविरुद्ध 48 रन केले. उरलेल्या तीनही बॉलरविरुद्धही ऋतुराजने 20 पेक्षा जास्त रन केले.
ऋतुराज टीम इंडिया बाहेर
मागच्या काही काळापासून ऋतुराज गायकवाड भारतीय टीममधून बाहेर आहे. ऋतुराज गायकवाडने भारताकडून शेवटचा टी-20 सामना 13 जुलै 2024 ला झिम्बाब्वेविरुद्ध खेळला, तर त्याने शेवटची वनडे 19 डिसेंबर 2023 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली. यंदाच्या आयपीएलमध्येही ऋतुराज गायकवाड सीएसकेचा कर्णधार होता, पण दुखापतीमुळे त्याला आयपीएल अर्ध्यामध्येच सोडावी लागली होती.