स्टार खेळाडूची निवृत्ती
इंग्लंडचा अनुभवी ऑलराऊंडर क्रीस वोक्सने वयाच्या 36व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. वोक्सने इंग्लंडकडून एकूण 217 सामने खेळले. 2013 साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 'आता वेळ आली आहे आणि मी ठरवले आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे. इंग्लंडकडून खेळण्याचं माझ लहानपणापासूनचं स्वप्न होतं. माझ्या अंगणात मी हे स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न मी जगू शकलो, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो', असं वोक्स म्हणाला आहे.
advertisement
गंभीरने केला सल्यूट
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने वोक्ससाठी इमोशनल पोस्ट केली आहे. भारताविरुद्धच्या शेवटच्या टेस्टमध्ये वोक्स खांदा निखळलेला असतानाही एका हाताने खेळण्यासाठी मैदानात उतरला. हाच फोटो गंभीरने शेअर केला आहे. पोलादी जिगर असलेला माणूस, मैदानात उतरणाऱ्या सगळ्यात धाडसी व्यक्तींपैकी एक म्हणून तू कायम स्मरणात राहशील, असं गंभीर म्हणाला आहे.
वोक्सने इंग्लंडकडून 62 टेस्ट खेळल्या, ज्यात त्याने 192 विकेट घेतल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये वोक्सने 5 वेळा एका इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या. तसंच 2018 साली त्याने लॉर्ड्सवर भारताविरुद्ध शतकही केलं. याशिवाय 122 वनडेमध्ये त्याने 173 विकेट घेतल्या. वोक्सला 33 टी-20 सामन्यांमध्ये 31 विकेट मिळाल्या आहेत.
अॅशेससाठी वोक्सची निवड नाही
इंग्लंडची टीम नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दौऱ्यात 5 टेस्ट मॅचची ऍशेस सीरिज खेळणार आहे. या सीरिजसाठी वोक्सची इंग्लंडच्या टीममध्ये निवड झाली नाही, त्यामुळे 6 दिवसांमध्येच वोक्सने निवृत्तीची घोषणा केली.