पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने 16 फेब्रुवारीपूर्वी इमरान खान यांची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते. सरकारी माहितीनुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता होती; मात्र प्रत्यक्षात डॉक्टरांना तुरुंगातच पाठवण्यात आले. 17 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात माजी क्रिकेटपटूंनी म्हटले आहे की, इमरान खान यांच्या दृष्टीत झपाट्याने घट होत असल्याच्या बातम्यांमुळे आम्ही अत्यंत चिंतित आहोत. गेल्या अडीच वर्षांपासून त्यांच्या प्रकृतीबाबत येणाऱ्या नकारात्मक बातम्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत.
advertisement
या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, इमरान खान यांच्यासारख्या उंचीच्या व्यक्तीशी जे माजी राष्ट्रीय नेते आणि जागतिक क्रीडा व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना योग्य सन्मान आणि मूलभूत मानवी हक्कांच्या चौकटीत वागणूक दिली गेली पाहिजे. पाकिस्तान सरकारने खालील सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
- त्यांच्या आरोग्य समस्यांवर उपाय करण्यासाठी त्यांच्या पसंतीच्या पात्र तज्ज्ञांकडून त्वरित, पुरेशी आणि सातत्यपूर्ण वैद्यकीय सेवा.
- आंतरराष्ट्रीय मानकांनुसार मानवी आणि सन्मानपूर्वक कारागृहातील परिस्थिती, ज्यामध्ये जवळच्या कुटुंबीयांना नियमित भेटीची परवानगी.
- कोणत्याही अनावश्यक विलंब किंवा अडथळ्यांशिवाय न्याय्य आणि पारदर्शक कायदेशीर प्रक्रियेपर्यंत प्रवेश.
- पत्रात पुढे म्हटले आहे की, क्रिकेट नेहमीच देशांमधील दुवा राहिले आहे. मैदानावरील स्पर्धा संपली की परस्पर सन्मान टिकून राहतो, हीच भावना इमरान खान यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत जपली. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शालीनता आणि न्यायाच्या तत्त्वांचे पालन करून या भावनेचा आदर करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. ही अपील केवळ क्रीडाभावना आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून करण्यात येत असून, कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या संयुक्त निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये मायकेल अॅथर्टन, अॅलन बॉर्डर, मायकेल ब्रेअरली, ग्रेग चॅपेल, इयान चॅपेल, बेलिंडा क्लार्क, सुनील गावस्कर, डेव्हिड गॉवर, किम ह्यूजेस, नासिर हुसेन, क्लाईव्ह लॉयड, कपिल देव, स्टीफन वॉ आणि जॉन राइट यांसारख्या जागतिक कीर्तीच्या क्रिकेट दिग्गजांचा समावेश आहे.
इमरान खान यांची गणना जगातील महान ऑलराउंडर्स आणि दिग्गज कर्णधारांमध्ये केली जाते. त्यांनी केवळ 1992 मध्ये पाकिस्तानला विश्वचषक जिंकून दिला नाही, तर एका संपूर्ण पिढीला नेतृत्व, जिद्द आणि क्रीडाभावनेची प्रेरणा दिली. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर त्यांनी ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ (पीटीआय) हा राजकीय पक्ष स्थापन केला. 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवून ते 2018 ते 2022 या काळात पाकिस्तानचे पंतप्रधान होते.
ऑगस्ट 2023 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर 100 हून अधिक प्रकरणांमध्ये आरोप ठेवण्यात आले असून, त्यामध्ये गोपनीय माहिती लीक करणे, सरकारी भेटवस्तूंची विक्री करणे यांसारखे गंभीर आरोप आहेत. मात्र इमरान खान यांनी हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीची स्थिती आणि कारागृहातील परिस्थिती याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा सुरू आहे.
