अबुधाबी : आशिया कपमध्ये गुप फेरीतील भारताची अंतिम मॅच शुक्रवारी ओमानविरुद्ध झाली. या सामन्यात स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या यांने एका सेट झालेल्या खेळाडूला बाद करताना अप्रतिम कॅच टिपला. या झेलच्या काही क्षण आधी पांड्या सीमारेषेजवळ एका सहाय्यक प्रशिक्षकाशी बोलताना दिसला होता. ओमानचा फलंदाज आमिर कलीम त्या वेळी 64 धावांवर खेळत होता.
advertisement
18व्या षटकात कलीमने हर्षित राणाच्या चेंडूवर फाइन लेगवरून फ्लिक मारला, पण पांड्याने अप्रतिम झेप घेत झेल टिपत त्याला तंबूत परत पाठवले. सोशल मीडियावर आलेल्या एका नव्या व्हिडिओत पांड्या हा झेल घेण्याच्या काही सेकंद आधी सीमारेषेजवळ सपोर्ट स्टाफशी बोलताना दिसतोय.
पांड्याने सामन्यात निर्णायक अशी शेवटची एक ओव्हर देखील टाकली. या ओव्हरमध्ये त्याने फक्त ६ धावा दिल्या आणि सेट झालेल्या हम्माद मिर्झाला (51) बाद केले. भारताने ओमानवर सहज विजय मिळवला.
मात्र फलंदाजीत पांड्या फार चमक दाखवता आली नाही. तो फक्त 1 धाव करून रनआऊट झाला. जितेन रमणंदीकडून तो धावबाद झाला.
या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने एकूण आठ गोलंदाजांचा वापर केला. ज्यामुळे संघातील खेळाडूंना सराव करण्याची संधी मिळाली. नवीन गोलंदाज हर्षित राणा (1/25) आणि अर्शदीप सिंग (1/37) काहीसे निष्प्रभ वाटले, पण कुलदीप यादवने (1/23) पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी केली. दरम्यान या सामन्यात अर्शदीप सिंगने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 100 विकेटचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. अर्शदीप पाकिस्तानविरुद्धच्या पुढील सामन्यात खेळेल की नाही, याबाबत अजून निश्चित नाही.
ओमानकडून कर्णधार जतिंदर सिंग (33 चेंडूत 32), ओपनर कलीम (46 चेंडूत 64) आणि मिर्झा (34 चेंडूत 51) यांनी जिद्दी खेळी केली. तरीही त्यांचा हा प्रतिकार भारताविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी अपुरा ठरला.