प्रत्येक बॉलरचा समाचार घेतला
3 जानेवारी रोजी विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात बडोदा संघाकडून खेळताना हार्दिक पांड्या याने विदर्भ विरुद्ध वादळी शतक झळकावलं. बडोद्याचा संघ एका वेळी अडचणीत सापडला होता, मात्र हार्दिकने केवळ डाव सावरला नाही तर विदर्भाच्या प्रत्येक बॉलरचा समाचार घेतला. विशेष म्हणजे 38 व्या ओव्हरपर्यंत बडोद्याचा स्कोर 182 धावांवर 7 विकेट असा होता, पण 39 व्या ओव्हरमध्ये हार्दिकने पार्थ रेखाडे या स्पिनरच्या एकाच ओव्हरमध्ये 5 सिक्स आणि 1 फोर मारून एकूण 34 धावा कुटल्या. या एका ओव्हरमुळे सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटलं.
advertisement
68 बॉलमध्ये शतक पूर्ण
हार्दिक पांड्याने आपले हे शानदार शतक केवळ 68 बॉलमध्ये पूर्ण केले. आपल्या या खेळी दरम्यान त्याने ८ सिक्स आणि ६ फोर लगावले. शतक पूर्ण केल्यानंतरही तो थांबला नाही आणि त्याने मैदानाच्या चारी बाजूंना फटकेबाजी सुरूच ठेवली. अखेर हार्दिकने ९२ बॉलमध्ये ८ फोर आणि ११ सिक्सच्या मदतीने १३३ धावांची तडाखेबंद इनिंग खेळली. यश ठाकूरने त्याला आऊट करून विदर्भाला मोठा दिलासा दिला.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवड होणार?
जेव्हा हार्दिक क्रीजवर फलंदाजीला आला होता, तेव्हा 19.1 ओव्हरमध्ये 71 धावांवर 5 विकेट पडल्या होत्या आणि बडोदा संघ संकटात होता. अशा कठीण परिस्थितीत त्याने जबाबदारीने खेळत संघाला 45.2 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 258 धावांपर्यंत मजल मारून दिली. हार्दिकच्या या फॉर्ममुळे आगामी न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी निवड समितीच्या निर्णयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
