बांगलादेशने भारतामध्ये सुरक्षेच्या कारणास्तव टी-20 वर्ल्ड कपचे सामने खेळायला नकार दिला, तसंच टी-20 वर्ल्ड कपमधले आपले सामने श्रीलंकेमध्ये खेळवले जावेत, अशी विनंती बांगलादेशने केली, पण आयसीसीने ही विनंती फेटाळली, त्यामुळे बांगलादेशने टी-20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला, यानंतर बांगलादेशला पाठिंबा म्हणून पाकिस्तानने भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी पाकिस्तान सरकारने सोशल मीडियावर पोस्ट करून याची घोषणा केली.
advertisement
पाकिस्तानवर होणार कारवाई
पाकिस्तानने एका सामन्यावर बहिष्कार टाकून इतर सामने खेळण्याचा घेतलेला निर्णय आयसीसीला पसंत पडलेला नाही. एका सामन्यावर बहिष्कार टाकल्यास पीसीबीला मोठा आर्थिक दंड होऊ शकतो, तसंच पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या इतर देशांच्या खेळाडूंना एनओसी देण्यावरही बंदी घातली जाऊ शकते. तसंच टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या टीमवर बहिष्काराची कारवाईही केली जाऊ शकते.
टी-20 वर्ल्ड कपला रवाना व्हायच्या एक दिवस आधी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्ध मॅच न खेळण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सीरिजमध्ये 3-0 ने विजय मिळवला, त्यानंतर आता पाकिस्तानची टीम श्रीलंकेला रवाना झाली आहे. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्ध, 10 फेब्रुवारीला अमेरिकेविरुद्ध आणि 18 फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध होणार आहे. पाकिस्तान त्यांचे तिन्ही सामने कोलंबोमध्ये खेळणार आहे.
