दुबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण राजकीय संबंध रविवारी आशिया कप 2025 च्या सामन्यातही स्पष्टपणे दिसून आले. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध 7 गडी राखून मिळवलेल्या विजयानंतर हस्तांदोलन करण्यास नकार देत 'मूक निषेध' नोंदवला. स्टेडियममधील या ‘नॉन-क्रिकेटिंग’ घटनेमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) कडे धाव घेतली आणि सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.
advertisement
सामन्यापूर्वी नाणेफेकीच्या वेळी पायक्रॉफ्ट यांनीच पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा यांना भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याशी हस्तांदोलन न करण्यास सांगितले होते, असा आरोप पीसीबीने केला आहे.
पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली. त्यांनी 'एक्स' वर पोस्ट करत म्हटले की, आयसीसीच्या आचारसंहितेचे आणि खेळाच्या भावनेशी संबंधित एमसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पीसीबीने आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. पीसीबीने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना आशिया कपमधून तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. नक्वी हे एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) चे अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी पायक्रॉफ्टवर नाणेफेकीच्या वेळी केलेल्या भूमिकेमुळे आयसीसीच्या आचारसंहितेचे आणि एमसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
यापूर्वी एशियन क्रिकेट कौन्सिलच्या सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले की- सामनाधिकारी पायक्रॉफ्ट हे सामन्यानंतर 'हँडशेक' न करण्याच्या प्रोटोकॉलची माहिती पाकिस्तानी खेळाडूंना देण्यास विसरले होते. त्यांनी या चुकीबद्दल पाकिस्तान संघाची माफीही मागितली होती.
पीसीबीने उर्दू भाषेत देशांतर्गत माध्यमांना जारी केलेल्या निवेदनात पायक्रॉफ्ट यांच्या निर्णयाला 'खेळाच्या भावनेच्या विरोधात' असल्याचे म्हटले आहे. तसेच संघ व्यवस्थापक नवीन अक्रम चीमा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे सामनाधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दल औपचारिक निषेध नोंदवल्याचेही निवेदनात म्हटले आहे. यावर आयसीसीने अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही.
खेळाडूंच्या गैरवर्तन पाहणे अत्यंत निराशाजनक आहे, असे मोहसीन नक्वी यांनी आपल्या 'एक्स' पोस्टमध्ये लिहिले आहे. खेळात राजकारण आणणे हे खेळाच्या मूळ भावनेच्या विरोधात आहे. आशा आहे की भविष्यातील विजय सर्व संघ खेळाच्या भावनेने साजरे करतील.
दरम्यान भारताला विजयी धाव देणाऱ्या सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन न करताच आपला सहकारी शिवम दुबेसोबत ड्रेसिंग रूममध्ये परत जाणे पसंत केले. यावर प्रतिक्रिया म्हणून आगा यांनी सामन्यानंतर माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना टीव्ही मुलाखत देणे टाळले. याला पाकिस्तानचे प्रशिक्षक माइक हेसन यांनी follow-on effect असे म्हटले.
मे महिन्यात पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारलेल्या न्यूझीलंडच्या हेसन यांनी सांगितले, आम्ही सामन्यानंतर हस्तांदोलन करण्यासाठी तयार होतो. पण विरोधी संघाने ते केले नाही, याची आम्हाला निराशा आहे. ते पुढे म्हणाले, आम्ही हस्तांदोलन करण्यासाठी त्यांच्याकडे गेलो. पण ते आधीच ड्रेसिंग रूममध्ये निघून गेले होते. सामना अशाप्रकारे संपणे निराशाजनक आहे. आम्ही आमच्या कामगिरीवर निराश आहोत, पण हस्तांदोलन करण्यास नक्कीच तयार होतो.