ऋषभ पंतची जागा धोक्यात
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टआधी ऋषभ पंतची टीम इंडियातली जागा धोक्यात आली आहे, त्याला कारण ठरलं आहे ते भारत ए आणि दक्षिण आफ्रिका ए यांच्यातली दुसरी अनधिकृत टेस्ट. या टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये ध्रुव जुरेलने खणखणीत शतकं ठोकली आहेत. पहिल्या इनिंगमध्ये नाबाद 132 रन केल्यानंतर ध्रुव जुरेल दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 127 रनवर खेळत आहे.
advertisement
वेस्ट इंडिजविरुद्धही जुरेलची बॅट तळपली
याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या 2 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्येही ध्रुव जुरेलची बॅट तळपली होती. पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ध्रुव जुरेलने 125 रनची खेळी केली. यानंतर दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 44 रन केले. इंग्लंड दौऱ्यातल्या पाचव्या टेस्टमध्ये ध्रुव जुरेलने महत्त्वाच्या रन केल्या, त्यामुळे भारताने ऐतिहासिक विजय मिळवला होता.
मागच्या काही काळापासून ध्रुव जुरेल सातत्याने रन करत आहे, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला टीमबाहेर कसं करणार? याची चिंता प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कॅप्टन शुभमन गिल यांना सतावत असेल. भारताचा माजी खेळाडू आर.अश्विन यानेही ध्रुव जुरेल याची ही खेळी पाहून त्याला टीमबाहेर करणं कठीण असल्याचं म्हटलं आहे.
'ध्रुव जुरेलला टीममधून कसं काढणार? पुढच्या टेस्टआधी त्याने कॅप्टन आणि कोचसाठी गोष्टी कठीण करून ठेवल्या आहेत. दक्षिण आफ्रिका ए विरुद्धच्या अनधिकृत टेस्टमध्ये त्याने दोन्ही इनिंगमध्ये शतकं केली आहेत', असं आर.अश्विन म्हणाला आहे.
