मुंबई: भारतीय चाहत्यांनी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली होती तो दिवस अखेर आलाच आहे. आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने भिडणार आहेत. टीम इंडियाने दमदार कामगिरी करत ट्रॉफी जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकलं, पण पाकिस्तानची डळमळीत अवस्था पाहता त्यांना फायनलमध्ये स्थान मिळेल असं वाटत नव्हतं. मात्र पाकिस्तानने सर्वांचे अंदाज खोटे ठरवत भारताविरुद्ध अंतिम लढत निश्चित केली आहे.
advertisement
या आशिया कपच्या या आवृत्तीत भारताने आजवर एकही सामना गमावलेला नाही. सलग विजयांची मालिका कायम ठेवत भारताने फायनल गाठलं आहे. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या विजयाबद्दल क्रिकेट तज्ज्ञ उत्साहाने बोलत आहेत. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या सुपर-4 सामन्यात गोलंदाजीतील चुका ही चिंतेची बाब ठरली. 202 धावा उभारूनही सामना टायपर्यंत गेला. सुपर ओव्हरमध्ये भारताने विजय मिळवला, पण त्या चुका पाकिस्तानविरुद्ध झाल्या तर महागात पडू शकतात.
भारताने चुका टाळल्या पाहिजेत
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या चुका सामन्याला थेट सुपर ओव्हरपर्यंत घेऊन गेल्या. सामन्यातील महत्त्वाच्या क्षणी कॅच सोडण्याची किंमत चुकवावी लागली आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. अखेरच्या षटकात विजयासाठी श्रीलंकेला 3 धावांची गरज असताना अक्षर पॅटेलने फिल्डिंगमध्ये चूक केली. अखेरीस दासुन शनाकाने शेवटच्या चेंडूवर फक्त दोन धावा घेतल्या आणि सामना टाय झाला.
हेच जर प्रसंग पाकिस्तानविरुद्ध आला, तर ते अशी संधी दवडणार नाहीत. पाकिस्तानी फलंदाज अशा परिस्थितीत संधी साधण्यात पटाईत आहेत. त्यांनी भारताच्या चुका नीट पाहिल्या आहेत – कोणत्या खेळाडूंनी किती कॅच सोडले याचीही त्यांना कल्पना आहे.
कॅच टपकवण्याचे आकडे
24 सप्टेंबर रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात सुपर-4 टप्प्यात सामना खेळला गेला. त्या सामन्यानंतर एक आकडेवारी समोर आली होती. त्यानुसार या स्पर्धेत आतापर्यंत तब्बल 53 कॅच सोडले गेले आहेत. त्यात धक्कादायक बाब म्हणजे भारतीय संघाने सर्वाधिक 12 कॅच सोडले होते.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 11 कॅचसह हाँगकाँगचा संघ होता. तर पाकिस्तानने केवळ 3 कॅच सोडले होते. यावरून स्पष्ट होतं की भारताने ही कमकुवत बाजू दूर केली नाही, तर फायनलमध्ये त्याला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.