मिझोरम क्रिकेट असोसिएशनने लालरेमरुआता याच्या निधनाच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. लालरेमरुआता रणजी ट्रॉफीमध्ये मिझोरमकडून दोन सामने खेळला, तसंच त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 7 वेळा मिझोरमचं प्रतिनिधित्व केलं. याशिवाय तो स्थानिक पातळीवर अनेक क्लबकडूनही खेळला. 'आमच्या संवदेना लालरेमरुआता याच्या कुटुंबासोबत आहेत. देव त्यांना या कठीण काळात सावरण्याची शक्ती देवो', असं मिझोरम क्रिकेट असोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे.
advertisement
मिझोरमचे क्रीडा आणि युवा सेवा मंत्री लालघिंगलोवा हमार यांनीही लालरेमरुआता याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, लालरेमरुआता याला सामन्यादरम्यान श्वास घेण्यास त्रास झाला आणि त्याचे निधन झाले. 'आज क्रिकेट सामन्यादरम्यान कोसळलेल्या के. लालरेमरुआता याच्या दुःखद निधनाने मला खूप दुःख झाले आहे. या कठीण काळात त्याच्या कुटुंबियांसोबत, मित्रांसोबत आणि क्रीडा क्षेत्रातील सदस्यांसोबत माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत," असे हमार म्हणाले.
