आयपीएल रिटेनशनच्या आधी फक्त 45 मिनिटं इंग्लिसने आपण पूर्ण आयपीएलसाठी उपलब्ध नसणार आहे, कारण आयपीएलच्या काळात आपण लग्न करणार असल्याचं त्याने पंजाब किंग्सला कळवलं. पंजाब किंग्सचे सहमालक नेस वाडिया यांनी इंग्लिसच्या या वर्तनावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. इंग्लिसचं वर्तन 'अव्यावसायिक' (अनप्रोफेशनल) असल्याची टीका नेस वाडिया यांनी केली आहे.
आयपीएलच्या मागच्या मोसमात जॉश इंग्लिस पंजाबकडून 2.60 कोटी रुपये घेऊन खेळला होता. यानंतर लिलावाच्या आधी त्याने लग्नाचं कारण दिलं. लग्न करत असल्यामुळे आपण मे महिन्याच्या शेवटी फक्त 10-15 दिवस 4 सामन्यांसाठी उपलब्ध असू, असं त्याने पंजाबच्या टीमला सांगितलं, त्यामुळे पंजाबने लिलावाआधी इंग्लिसला रिलीज केलं.
advertisement
लग्नाचा प्लान बदलणार
आयपीएल लिलावामध्ये इंग्लिसला लखनऊ सुपर जाएंट्सने तब्बल 8 कोटी 60 लाख रुपयांना विकत घेतलं आहे. यानंतर आता इंग्लिस त्याच्या लग्नाचा प्लान बदलण्याच्या तयारीत आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार इंग्लिस आयपीएलच्या सुरूवातीला खेळून त्याच्या लग्नाला जाऊ शकतो. तसंच लग्नानंतर तो लगेच आयपीएल खेळण्यासाठी येईल आणि आयपीएल संपल्यानंतर हनिमूनला जाऊ शकतो. इंग्लिसचं मन वळवण्यासाठी लखनऊचे प्रशिक्षक जस्टिन लँगर प्रयत्न करत असून त्याच्या संपर्कात आहेत. इंग्लिस आणि लँगर हे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचेच आहेत.
इंग्लिस आयपीएल खेळण्यासाठी हनिमून पुढे ढकलू शकतो, असं वृत्त समोर आल्यानंतर पंजाब किंग्सने नाराजी व्यक्त केली आहे. तसंच इंग्लिसविरोधात पंजाब किंग्स बीसीसीआयकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहे. इंग्लिसच्या या वादाबद्दल लखनऊ सुपर जाएंट्सकडूनही प्रतिक्रिया आली आहे. इंग्लिस वैयक्तिक कारणांमुळे पूर्ण आयपीएल खेळणार नव्हता, पण तो त्याचा निर्णय कधीही बदलू शकतो, असं लखनऊचे बॉलिंग प्रशिक्षक वरुण एरॉन म्हणाला आहे.
जॉश इंग्लिसने आयपीएलच्या मागच्या मोसमात आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. 11 सामन्यांमध्ये त्याने 162 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने 278 रन केले होते.
