आता आयपीएल 2026 च्या मोसमाआधी केकेआर अजिंक्य रहाणेला रिलीज करेल, असं बोललं जात होतं. पण क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार अजिंक्य रहाणेला केकेआर रिलीज करणार नाही, एवढंच नाही तर रहाणेच केकेआरचा कर्णधार राहील. अजिंक्य रहाणे केकेआरचा मागच्या मोसमातला सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता, त्याने 150 च्या स्ट्राईक रेटने 390 रन केले होते.
advertisement
दिल्लीसोबतची बोलणी फिस्कटली
केकेआरची केएल राहुलसाठी दिल्ली कॅपिटल्ससोबत बोलणी सुरू होती. तसंच राहुलला केकेआरचा कॅप्टनही होऊ शकला असता, पण दिल्ली कॅपिटल्सच्या दोन पैकी एका मालकाने केएल राहुलला सोडायला नकार दिला, त्यामुळे रहाणेच केकेआरचा कर्णधार राहणार आहे.
अय्यरला सोडणार शाहरुख
दुसरीकडे केकेआर मागच्या लिलावातला त्यांचा सगळ्यात महागडा खेळाडू व्यंकटेश अय्यरला सोडणार आहे. आयपीएलच्या मागच्या लिलावात केकेआरने अय्यरला 23.75 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं, पण 11 सामन्यांमध्ये त्याला फक्त 142 रन करता आल्या. आयपीएलच्या मागच्या काही मोसमांपासून व्यंकटेश अय्यर केकेआरच्या टीमचा महत्त्वाचा भाग होता. केकेआरने 2024 आयपीएल जिंकली तेव्हा अय्यरची भूमिका मोलाची होती, त्यामुळे केकेआर अय्यरला लिलावात पुन्हा एकदा कमी किंमतीत विकत घेण्याची शक्यता आहे.
आणखी कुणाला सोडणार केकेआर?
व्यंकटेश अय्यरशिवाय केकेआर क्विंटन डिकॉक (3.6 कोटी) आणि एनरिक नॉर्किया (6.5 कोटी) यांनाही रिलीज करण्याची शक्यता आहे. हे खेळाडू सोडल्यानंतर केकेआरकडे लिलावामध्ये 35-40 कोटी रुपये शिल्लक राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे केकेआर लिलावात ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरून ग्रीनला विकत घेण्याची शक्यता आहे.
