पहिल्याच बॉलवर राहुल आऊट
लखनऊने दिलेल्या 142 रनच्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या दिल्लीला पहिल्याच बॉलला धक्का लागला. लखनऊकडून आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या मोहम्मद शमीने दिल्लीचा ओपनर केएल राहुलला शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
मोहम्मद शमीने टाकलेल्या आऊट स्विंगवर केएल राहुलने कव्हच्या वरून हवेत शॉट मारला, पण राहुलच्या बॅटजी एज लागली आणि बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या मोहसिन खानने कॅच पकडला. पहिल्याच बॉलला विकेट घेतल्यानंतर मोहम्मद शमीने जोरदार सेलिब्रेशन केलं. लखनऊसोबत मोहम्मद शमीचा हा पहिलाच सिझन आहे, याआधी मागच्या मोसमात शमी सनरायजर्स हैदराबादसोबत होता, पण निराशाजनक कामगिरीनंतर हैदराबादने त्याला लखनऊकडे ट्रेड केलं.
advertisement
शमी-आगरकरचा वाद
2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळल्यानंतर मोहम्मद शमीची टीम इंडियात निवड झाली नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतरही टीम इंडियात निवड होत नसल्यामुळे मोहम्मद शमीने निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्यावरही निशाणा साधला होता, ज्यावर अजित आगरकर यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. शमी आणि आगरकर यांच्यात उडालेल्या खटक्यांमुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.
रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये भेदक बॉलिंग केल्यानंतर आता मोहम्मद शमीने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच बॉलला विकेट घेऊन पुन्हा एकदा भारतीय निवड समितीला त्याच्या कामगिरीतूनच प्रत्युत्तर दिलं आहे.
शमीचा विक्रम
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिकवेळा पहिल्या बॉलला विकेट घेण्याचा विक्रमी मोहम्मद शमीच्या नावावर आहे. शमीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 5 वेळा पहिल्या बॉलला विकेट मिळवली आहे. प्रविण कुमार, उमेश यादव, ट्रेंट बोल्ट, लसिथ मलिंगा, भुवनेश्वर कुमार, अशोक डिंडा आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 3 वेळा आयपीएलमध्ये पहिल्या बॉलला विकेट घेतली आहे.
