आयपीएल 2026 मधले आरसीबीचे सामने बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्येच होतील, अशी माहिती कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी दिली आहे. 4 जून रोजी स्टेडियममध्ये चेंगराचेंगरी झाली, त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर कोणत्याच सामन्यांचं आयोजन केलं गेलं नाही. महिला वर्ल्ड कपचे चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणारे सामनेही नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये झाले, त्यामुळे आयपीएलचे आरसीबीचे सामने बंगळुरूमध्ये होणार का? याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती. आता डी.के.शिवकुमार यांनी केलेल्या घोषणेमुळे सस्पेन्स संपला आहे.
advertisement
आरसीबीने 2025 मध्ये पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली, त्यानंतर 4 जूनला चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयी परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी आरसीबीच्या चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि 11 जणांचा मृत्यू झाला तर 56 जण जखमी झाले.
काय म्हणाले डीके शिवकुमार?
'मी क्रिकेटचा चाहता आहे. कर्नाटकात घडलेली घटना पुन्हा घडू नये आणि बंगळुरूची प्रतिष्ठा जपणाऱ्या पद्धतीने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या जातील याची आम्ही खात्री करू. केएससीए कायदेशीर चौकटीत स्टेडियम चालवेल आणि योग्य प्रेक्षक व्यवस्थापन उपाययोजना राबवेल', असं शिवकुमार म्हणाले.
'आम्ही आयपीएलचे स्थलांतर करणार नाही आणि चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयपीएल आयोजित करत राहू. हा बेंगळुरू आणि कर्नाटकचा अभिमान आहे आणि आम्ही तो कायम ठेवू.' महिलांच्या सामन्यांबद्दल विचारले असता ते म्हणाले की सरकार त्यांच्यासाठीही संधी सुनिश्चित करेल, असं शिवकुमार यांनी स्पष्ट केलं. तसंच भविष्यात मोठं स्टेडियम बांधलं जाईल, असंही शिवकुमार यांनी सांगितलं.
