दुसरीकडे आयपीएलच्या इतर 9 टीमही खेळाडूंच्या ट्रेडसाठी बोलणी करत आहेत. मागच्या काही काळापासून मोहम्मद शमी टीम इंडियातून बाहेर आहे, पण आयपीएलमध्ये मात्र शमीसाठी दोन टीम आग्रही आहेत. आयपीएल 2025 मध्ये खराब कामगिरी आणि दुखापतींचा सामना करणाऱ्या मोहम्मद शमीला सनरायजर्स हैदराबाद रिलीज करणार होती, पण आता शमीला ट्रेड करण्यासाठी दोन टीमनी उत्सुकता दाखवली आहे.
advertisement
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार सनरायजर्स हैदराबाद मोहम्मद शमीला लखनऊ सुपर जाएंट्स किंवा दिल्ली कॅपिटल्ससोबत ट्रेड करू शकते. शमीचं हे डिल ऑल कॅश किंवा एखाद्या खेळाडूसोबत होऊ शकतं. मागच्या वर्षी झालेल्या आयपीएलच्या मेगा लिलावामध्ये हैदराबादने शमीला 10 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं, पण 2026 च्या मोसमात शमी दुसऱ्या टीमकडून खेळताना दिसू शकतो.
मागच्या आयपीएलमध्ये मोहम्मद शमीची कामगिरी निराशाजनक झाली होती. शमीने 56.17 ची सरासरी आणि 11.23 च्या इकोनॉमी रेटने फक्त 6 विकेट घेतल्या होत्या. वय, फिटनेस आणि दुखापतींमुळे शमीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही ब्रेक लागला आहे. 35 वर्षांचा मोहम्मद शमी टीम निवडीच्या वादावरूनही चर्चेत आला होता.
12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये शमीने भारताच्या फास्ट बॉलिंगचं नेतृत्व केलं. यात त्याने 64 टेस्ट, 108 वनडे आणि 25 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या. लखनऊ सुपर जाएंट्स आणि दिल्ली कॅपिटल्सने शमीला विकत घेण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. जर सनरायजर्सने ही ऑफर स्वीकारली तर शमी लिलावामध्ये उतरणार नाही, पण ही डिल फिस्कटली तर मात्र 16 डिसेंबरला होणाऱ्या आयपीएल लिलावात मोहम्मद शमीचं नाव दिसू शकतं.
